गरीब, मध्यमवर्गीयांनाही दिलासा मिळणार

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आता यकृत प्रत्यारोपण केंद्र तयार करण्याच्याही हालचालींना वेग देण्यात आला आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना या केंद्रात सेवा देण्यासाठी काही तज्ज्ञ प्रत्यारोपण तज्ज्ञांनी अनुकूलता दर्शवल्यावर प्रशासनाने त्या दिशेने पावले उचलली आहेत.

विदर्भात केवळ नागपूरच्या न्यू ईरा रुग्णालय, वोक्हार्ट रुग्णालय, एलेक्सिससह इतर काही निवडक खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण केंद्र मंजूर आहेत. या केंद्रातच सध्या मेंदूमृत व्यक्तीच्या अवयवदान अथवा रक्ताच्या नातेवाईकाने गरजूला यकृत दान केल्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होते. परंतु या खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला वीस लाखाहून अधिक खर्च येत असल्याने गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांच्या आवाक्याबाहेर हा खर्च जातो. त्यामुळे हे यकृत प्रत्यारोपण शासकीय रुग्णालयात झाल्यास महात्मा ज्योतिबा फुले योजनेसह इतर योजनेतून कमी दरात रुग्णांवर ही शस्त्रक्रिया शक्य आहे.

अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी त्यामुळे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हे प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याच्या दिशेने सुरुवात केली आहे. दरम्यान  डॉ. सजल मित्रा यांची नुकतीच मुंबईचे सुप्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहनती यांच्यासह नागपुरातील डॉ. राहुल सक्सेना यांनी भेट घेतली होती. याप्रसंगी चर्चेत दोन्ही तज्ज्ञांनी गरिबांनाही प्रत्यारोपणाची सेवा मिळावी म्हणून प्रसंगी येथे प्रत्यारोपण करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे प्रशासनाने हे केंद्र तयार करण्याच्या प्रकल्पाला गती दिली आहे. हे केंद्र झाल्यास येथे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांच्याही आवाक्यात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया येणार आहे. त्यातच नुकतीच सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ह्रदय प्रत्यारोपण केंद्राला आरोग्य खात्याकडून मंजुरी मिळाली आहे. त्यापूर्वी येथे अनेक महिन्यांपासून मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत. यकृत प्रत्यारोपण केंद्र झाल्यास हे शासकीय रुग्णालय अवयव प्रत्यारोपणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येण्यास मदत होणार आहे.

अलीकडे यकृताचे आजार असणारे रुग्ण वाढले आहेत.  हिपेटायटीस ‘सी’ आणि ‘ड’  च्या रुग्णांनाही यकृताच्या विकाराचा धोका जास्त आहे. त्यातील काहींना यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. या रुग्णांना विदर्भात एकही शासकीय प्रत्यारोपण केंद्राचा पर्याय नाही. त्यामुळे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात केंद्र सुरू करण्यासह प्रत्यारोपण सुरू झाल्यास गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना लाभ होईल.

– डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, नागपूर.