X

घटना बदलणे म्हणजे देशद्रोह!

फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुक्ष्म किंवा संकुचित रुपाने समाज पाहू शकत नाही.

मुख्यमंत्र्यांची भूमिका; ‘आंबेडकर केवळ सुधारक नव्हे, तर राष्ट्रनिर्माते’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान जगातील सर्वोत्तम असल्यामुळे ते बदलणे म्हणजे देशद्रोह होईल आणि समाजाची फसवणूक होईल, त्यामुळे संविधान बदलण्याचा कुठलाही सरकारचा विचार नसल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार,  सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई होते.

फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुक्ष्म किंवा संकुचित रुपाने समाज पाहू शकत नाही. डॉ. आंबेडकर केवळ समाज सुधारक किंवा अर्थशास्त्र नव्हते तर ते राष्ट्रनिर्माता होते. राष्ट्रनिर्माता म्हणून या देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते आणि ते कोणी विसरु शकत नाही. भारत एक बलशाही राष्ट्र समोर आले ते केवळ डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच. संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा आणि समानतेचा अधिकार दिला आहे आहे. त्यामुळे समाजातील शेवटचा व्यक्ती सर्वोच्च पदावर जाऊ शकतो. डॉ. आंबेडकर नसते तर गुजराथमधील एक चहावाला  देशातील प्रधानमंत्री झाला नसता. संविधान कोणी बदलू शकत नाही आणि तो बदलण्याचा प्रयत्न कोणी करु शकणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. शस्त्राशिवाय जगाला जिंकणारा एकच धर्म आहे तो म्हणजे बौद्ध धर्म आहे. माझ्या जीवनावर भगवान बौद्धाचा विचाराचा सर्वाधिक पगडा आहे. बुद्धाचा विचारच जगाला समृद्ध बनवु शकतो असेही फडणवीस म्हणाले. दीक्षाभूमी विकासाचा आराखडा लवकरच कार्यान्वित होईल. शिवाय बुद्धीस्ट टुरिझम सर्किट प्लान कार्यान्वित केला जाणार असून त्यासाठी शंभर कोटीची तरतुद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले, दीक्षाभूमी ही प्रत्येकासाठी पवित्र भूमी आहे. आरक्षण आणि संविधान बदलणार नाही. आरक्षासाठी आम्ही कटीबद्ध आहो त्यामुळे दलित समाजाने त्याबाबत चिंता करु नये.

  • Tags: devendra-fadnavis, indian-constitution,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain