‘लग्न पाहावे करून..’ असे म्हटले जाते ते काही उगाच नाही. कारण, लग्न करताना सर्व आघाडय़ांवर एकाचवेळी सामोरे जावे लागते. करोनाने तर लग्नाचे आव्हान आणखी कडवे केले आहे. चौथी टाळेबंदी जाहीर करताना लग्नासाठी ५० वऱ्हाडय़ांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्याचवेळी सभागृह, लॉनवरची बंदी मात्र कायम आहे. शहरांमध्ये अनेक कुटुंब तीन खोल्यांच्या सदनिकेत राहतात. इतक्या कमी जागेत सामाजिक अंतर पाळत ५० वऱ्हाडय़ांची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न वर-वधू पक्षांना अस्वस्थ करीत आहे.

करोनामुळे लग्नासाठीसुद्धा नवनव्या सरकारी निर्देशांची दिवसागणिक भर पडत आहे. एका पाठोपाठ एक लागू केलेली टाळेबंदी आणि या टाळेबंदीत केवळ २० वऱ्हाडय़ांच्या उपस्थितीत लग्नाची घातलेली अट यामुळे राज्यभरातील विवाह सोहळे अडकून पडले होते. मात्र सरकारने २० वऱ्हाडय़ांची अट शिथिल करून ५० वऱ्हाडय़ांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. मात्र सामाजिक अंतराची अट कायम आहे.

किमान अटी, शर्तीवर हॉटेल किंवा सभागृहात लग्नाची परवानगी मिळावी यासाठी अनेकजण स्थानिक प्रशासनाकडे खेटय़ा घालत आहेत. परंतु वऱ्हाडय़ांची संख्या वाढवणारे ‘उदार’ प्रशासन हॉटेल किंवा सभागृहांवरची बंदी मागे घ्यायला तयार नाही. सरकारच्या या विरोधाभासी निर्णयावर वर-वधूंच्या पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अडचण काय?

गावांमध्ये मोकळी जागा असल्याने सामाजिक अंतराची अट पाळणे शहराच्या तुलनेत सोपे आहे. मात्र शहरांमध्ये अनेकांची घरे लहान आहेत. या घरांना अंगणही नाही. शहरातील अनेक जण तर मर्यादित खोल्यांच्या सदनिकेत राहतात. येथे सामाजिक अंतर पाळून विवाह करायचा असेल तर दहा वऱ्हाडय़ांनाही उभे राहायला जागा पुरणार नाही. शिवाय इतक्या पाहुण्यांसाठी स्वच्छतागृहाची सोय, त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था यांसारखे प्रश्नही यजमानांची झोप उडवत आहेत.

नियम पाळूनही नोटीस बजावली सुभाष यादव यांनी सामाजिक अंतराचे भान ठेवून फेटरीजवळील त्यांचे शेत लग्नासाठी उपलब्ध करून दिले. वर आणि वधुकडील मंडळींची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांनी लग्नाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, शेतात पार पडलेल्या या लग्नकार्यात सर्व नियम पाळूनही स्थानिक ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस बजावली आहे.

परीक्षेमुळे लग्न आधी केले आणि..

सरकारने जुलै महिन्यात महाविद्यालयीन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे नागपूरच्या रहाटगावकर कुटुंबाने २९ जूनला असेलेले मुलीचे लग्नकार्य १९ मे रोजी घरीच केले. आता सरकारने परीक्षाच न घेण्याचा निर्णय घेतला. सरकारचे असे ढिसाळ नियोजन आणि नियमांचा फटका अनेकांना बसत आहे.

जिल्हा सीमेवरच लग्नगाठ

करोनामुळे सरकारने घातलेल्या अटी-शर्तीना कंटाळून चंद्रपुरात जिल्हा सीमेवरच लग्नगाठ बांधण्यात आली.  २९ मार्च रोजी हा विवाह सोहळा होणार होता. सर्व तयारी झाली अन् टाळेबंदी लागली. स्थिती सामान्य झाल्यानंतर लग्न करू, असे ठरले. मात्र, टाळेबंदी संपेचना. अखेर १९ मे रोजी वधूच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून लग्नासाठी परवानगी मिळाली. पण, वराला मिळालीच नाही. मग काय.. वर-वधू आपापल्या पाच नातेवाईकांना घेऊन आंतर जिल्हा सीमेवर पोहचले आणि वैनगंगा नदीच्या पुलावरच लग्नगाठ बांधली.