अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उपस्थित राहणार आहेत.  १५ जानेवारीला नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. राज्यपालांचे संघप्रेम लपून राहिलेले नाही. यापूर्वी त्यांच्या नागपूर दौऱ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपाल यांची भेट घेतली होती.

निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार, १५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जुनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर येथून होणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचे विमानाने नागपुरात आगमन होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता निधी समर्पण, गृहसंपर्क अभियानाच्या निमित्ताने रामजी महाराज मठ, राऊत चौक, मस्कासाथ येथून आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज परिसरात गृहसंपर्क करीत श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीकरिता भिक्षा मागतील.