तत्कालीन राज्यपालांनी विचारला होता डॉ. भाऊ लोखंडे यांना सवाल

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : कुलगुरूपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमदेवाराचे राजकीय पक्षाशी संबंध नको, ही अट आपल्याला माहिती नव्हती का , अशी विचारणा तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांनी केली होती, असे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

कुलगुरूंचे राजकीय पक्षासोबत संबंध हा विद्यापीठ कायद्याचा भंग ठरतो. त्यामुळे  विद्यमान कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजप नेते व  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतलेली भेट सध्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर  डॉ. लोखंडे यांनी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण ठरते.

‘लोकसत्ता’ने डॉ. सुभाष चौधरी यांची कुलगुरूपदी नियुक्ती आणि त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर समाजातील विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी खुद्द डॉ. भाऊ लोखंडे यांनी या संदर्भातील त्यांचा अनुभव लोकसत्ताकडे सांगितला.  त्यानुसार  सन २००० मध्ये नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पहिल्या पाचमध्ये डॉ. लोखंडे यांची निवड झाली होती. यावेळी तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांनी डॉ. लोखंडे यांची मुलाखत घेतली होती.

डॉ. लोखंडे यांनी १९९० मध्ये रिपाइं आणि काँग्रेस युतीकडून  विधानसभेची निवडणूक लढवली होती. मुलाखतीदरम्यान डॉ. लोखंडे यांनी नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात आजपर्यंत अनुसूचित जाती जमातीपैकी कुलगुरू झालेले नाही. आपण यादृष्टीने न्याय द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर डॉ. अलेक्झांडर यांनी ‘तुम्हाला माहिती नाही का, कुलगुरू पदासाठी राजकीय संबंध असणे ही अपात्रता आहे.’ अशी विचारणा केली होती.   त्यावेळी डॉ. अरुण सातपुतळे यांची कुलगुरूपदी निवड झाली होती.

इतक्या वर्षांनंतर हा मुद्दा आता नवीन कुलगुरूंच्या निवडीवरून  व त्यांच्या राजकीय संबंधावरून पुन्हा चर्चेत आला आहे.  भाऊ लोखंडे यांनी  त्यांचे अनुभव सांगून अप्रत्यक्षरित्या विद्यापीठ कायद्याकडे विद्यमान राज्यपालांचे  लक्ष वेधले आहे.

नवीन कुलगुरूंचे अभिनंदन आणि स्वागत. मात्र, मी कुलगुरू पदासाठी मुलाखत दिली तेव्हा डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांनी राजकीय संबंधांचे कारण सांगून मला अपात्र ठरवले होते. विद्यापीठाच्या परवानगीने मी १९९० मध्ये निवडणुका लढवल्या होत्या. विद्यापीठ कायदा हा १९९४ ला आला होता. असे असतानाही डॉ. अलेक्झांडर यांनी कायद्याचा आधार घेत मला अपात्र ठरवले होते. ‘लोकसत्ता’मध्ये नवीन कुलगुरूंच्या निवडीवरून कायद्याचा दाखला वाचून माझ्यासोबत घडलेला प्रसंग आठवला.

– डॉ. भाऊ लोखंडे, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत