कारागृह विभागात अधिकाऱ्यांचा तुटवडा
अनेक वर्षांपासून कारागृह विभागात अधिकाऱ्यांची पदभरती झाली नसून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्तावही रखडले आहेत. त्यामुळेच विदर्भातील अनेक कारागृहांमध्ये तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांकडे कारागृह अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे धक्कादायक चित्र विदर्भासह संपूर्ण राज्यात असल्याचेही दिसून येते.
विदर्भात नागपूर आणि अमरावती येथे मध्यवर्ती कारागृहे आहेत. त्याशिवाय यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली येथे जिल्हा कारागृहे आहेत. तर मोर्शी, नागपूर आणि गडचिरोली येथे खुली कारागृहे आहेत. नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहात नियमित अधीक्षक आहेत. तर उर्वरित जिल्हे व खुल्या कारागृहांची जबाबदारी उपअधीक्षक, श्रेणी-२ आणि श्रेणी-३ च्या तुरुंगाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली. श्रेणी-३ चे कर्मचारी हे कारागृहांची सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी असतात. परंतु त्यांच्याकडे आता कारागृहाच्या सुरक्षेसह प्रशासकीय कामांचा भार देण्यात येत आहे. त्यामुळे तुरुंगाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करणारे अनेक तुरुंगाधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगाधिकाऱ्यांना उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली नाही. शिवाय एमपीएससी नसलेल्या तुरुंगाधिकाऱ्यांकडे कारागृह अधीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. त्यामुळे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये प्रशासनासंदर्भात नाराजीचे सूर उमटत आहेत. तर नागपूर मध्यवर्ती कारागृहात विनाकामाचे दोन-दोन उपअधीक्षक ठेवण्यात आले आहेत. विविध ठिकाणी कार्यरत अतिरिक्त उपअधीक्षकांना इतर जिल्हा कारागृहांची जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.

शासनाकडे प्रस्ताव
या बाबी संदर्भात शासनाला अनेक प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल. तसेच नवीन पदभरतीसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे दिसून येते. लवकरच कारागृह विभागातील परिस्थिती बदलेल.
– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि तुरुंग विभाग प्रमुख.