भाजपच्या भक्कम फळीला ओबीसीच्या मुद्याचे आव्हान

नागपूर : मर्यादित मतदारसंख्या, त्यात पक्षाच्या  पारंपरिक विचाराचा पगडा असणाऱ्यांची संख्या अधिक, त्यांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी असलेली कार्यकत्र्यांची भक्कम फळी यामुळे भाजपचा बालेकिल्ला ठरलेल्या विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील यावेळची निवडणूक काँग्रेसने ओबीसीच्या मुद्यावरून जातीय वळणावर नेल्याने चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मोठ्या संख्येने रिंगणात असलेले अपक्ष, यापैकी काहींना पदवीधरांच्याच विविध घटक व संघटनांचा पाठिंबा, यामुळे या उमेदवारांना पडणारी मते विजय आणि पराजयासाठी निर्णायक ठरू शकतात.

मंगळवारी १ डिसेंबरला या मतदारसंघातील ३२२ केंद्रांवर मतदान होणार असून २ लाख ६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी भाजपचे उमेदवार व महापौर संदीप जोशी, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित वंजारी, विदर्भवादी संघटनांचे नितीन रोंघे, यांच्यासह सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा (अपक्ष), प्रशांत डेकाटे (अपक्ष), अतुल खोब्रागडे (अपक्ष), नितेश कराळे (अपक्ष) आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपचे संदीप जोशी हा निवडणुकीतील युवा चेहरा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ ही त्यांची जमेची बाजू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विभागातील सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या आहेत. विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांना उमेदवारी नाकारल्यामुळे पक्षांतर्गत उसळलेली नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले. काँग्रेसने त्यांच्या विरोधात ओबीसीचा मुद्दा पुढे केला असला तरी २००८ मध्येही असाच प्रयोग झाला होता. पण, त्याचे मतांमध्ये परिवर्तन करण्यात काँग्रेसला यश आले नव्हते हे येथे उल्लेखनीय.  देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी सुरुवातीला दोन आणि शेवटचे दोन असे चार दिवस या मतदारसंघासाठी दिल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होते.

दुसरीकडे काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी सुरू करून केलेली मतदार नोंदणी त्यांच्या  फायद्याची ठरू शकते. काँग्रेसचे मंत्री अनुक्रमे नितीन राऊत, सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार त्यांच्यासोबत आहे.

विधान सभेचे अध्यक्ष व ओबींचे नेते नाना पटोले यांनी सुद्धा वंजारींसाठी सभा घेतल्या. वंजारी यांची विद्यापीठ राजकारणातील सक्रियता, शैक्षणिक संस्थांचे जाळे, या माध्यमातून पदवीधरांशी असलेला संपर्क आणि तेली समाजाचे पाठबळ  या त्यांच्या जमेच्या बाजू आहे, तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रचारातील असहभाग ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. काँग्रेस नेते व मंत्र्यांनी प्रचारात सहभागी होऊन एकीचे दर्शन घडवले असले तरी त्याचे प्रतिबिंब मतांमध्ये किती उमटते, यावरच या एकीचे फायदे अवलंबून असणार आहेत. बसपाचा उमेदवार रिंगणात नसणे ही काँग्रेससाठी दिलासा देणारी बाब आहे.

या मतदारसंघात मोठ्या संख्येने दलितांची मते आहेत. त्यावर काँग्रेससह इतरही अपक्ष उमेदवारांचा डोळा आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रशांत डेकाटे, अतुल खोब्रागडे, विनोद राऊत यांचा समावेश आहे. डेकाटे यांना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याची माहिती आहे. मात्र याला दुजोरा मिळू शकला नाही. अपक्ष उमेदवार राजेंद्र भुतडा हे सनदी लेखापाल आहेत. हा वर्ग भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. त्यामुळे भुतडांची उमेदवारी भाजपसाठी त्रासदायक ठरू शकते. नितीन कराळे हा आणखी एक तरुण उमेदवार त्याच्या ग्रामीण भाषाशैलीमुळे पदवीधरांमध्ये अल्पकाळात लोकप्रिय ठरला आहे. ग्रामीण भागातील मते त्यांच्याकडे वळू शकतात. विदर्भवादी नितीन रोंघे यांनी विदर्भाच्या मुद्यावर मतदारांना आवाहन केले आहे. उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय आणि विदर्भ राज्य चळवळीतील त्यांचा संपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र त्यांची उमेदवारी ही काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसाठी धोक्याची घटा ठरणारी आहे.

एकूण मतांपैकी निम्मे मतदार हे एकट्या नागपूर शहरात असून तेच निर्णायक आहेत. एकूण मतदान किती होते यावरही बरेच काही अवलंबून आहे. गतवेळी ३७ टक्के मतदान झाले होते व भाजपचे प्रा. अनिल सोले हे ५२,४८५ मते घेऊन विजयी झाले होते. काँग्रेसचे बबन तायवाडे यांना २१,२२६ तर बसपाचे किशोर गजभिये यांना १९,४५५ मते मिळाली होती. एकूण २ लाख ८७ हजार ११८ मतदारांपैकी १ लाख ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी २०१४ च्या तुलनेत  यावेळी ८१ हजारांनी मतदारांची संख्या कमी झाली आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली तर भाजपसाठी अडचणीची व काँग्रेससाठी त्यांच्या आशा पल्लवीत करणारी ठरू शकते. सध्यातरी भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का लागेल असे चित्र नाही. काँग्रेसच्या ‘मिशन परिवर्तन’ने निवडणूक चुरशीची केली खरी, पण त्याचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले तरच धक्कादायक निकालाची शक्यता आहे.

एकूण उमेदवार -१९

एकूण मतदार -२ लाख ६,४५४

एकूण मतदार केंद्र -३२२

प्रमुख लढत -भाजप विरुद्ध काँग्रेस