मध्य भारतातील पहिली शासकीय संस्था ठरणार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अखत्यारित असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण युनिटला महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून परवानगी मिळत नसल्याने रखडले होते. परंतु नुकतीच महामंडळाकडून या प्रकल्पाकरिता परवानगी मिळाल्याचे एक पत्र मेडिकल प्रशासनाला मिळाले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काही प्रक्रिया पूर्ण होताच किडनी प्रत्यारोपण सुरू झाल्यास ही मध्य भारतातील पहिली शासकीय संस्था ठरेल, हे विशेष.
नागपूरसह संपूर्ण देशात किडनीच्या आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. किडनीचा विकार जडल्याने मध्य भारतातील हजारो रुग्ण डायलिसीसवर आपले आयुष्य जगत आहे. शेकडो रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज असतानाही किडनी उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा मृत्यूही होतो. या रुग्णांना दिलासा देण्याकरिता नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मध्य भारतातील पहिल्या किडनी प्रत्यारोपण युनिटची घोषणा महाराष्ट्र शासनाकडून अनेक वर्षांपूर्वी विधानसभेत करण्यात आली होती. परंतु शासनाकडून आवश्यक निधीसह या विभागाकरिता तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक कर्मचारी, तंत्रज्ञ उपलब्ध करून दिल्या गेले नसल्याने हा प्रकल्प रखडला होता.
परंतु सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी विशेष कार्य. अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची नियुक्ती झाली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मदतीने या प्रकल्पाकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. दरम्यान, या प्रकल्पाकरिता महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची परवानगी आवश्यक असल्याचे पुढे आले. तातडीने प्रस्ताव सादर केल्यावरही प्रदूषण मंडळाकडून परवानगी मिळत नसल्याने हा प्रस्ताव रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हा विषय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मेडिकलमध्ये घेतलेल्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही पुढे आला होता. तातडीने ही परवानगी देण्याच्या सूचना गडकरींकडूनही संबंधित विभागाला दिल्या होत्या.
शेवटी या प्रकल्पाकरिता महामंडळाची परवानगी मिळाल्याचे एक पत्र नुकतेच मेडिकल प्रशासनाला मिळाले आहे. दरम्यान, मेडिकल व सुपर प्रशासनानेही किडनी प्रत्यारोपणाकरिता काही दिवसांपूर्वी काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीही केल्या आहे. तेव्हा इतर आवश्यक कर्मचारी, तंत्रज्ञ उपलब्ध होण्यासह आरोग्य विभागाकडूनच्या औपचारिकता पूर्ण होताच येथे किडनी प्रत्यारोपण सुरू होण्याच्या आशा बळावल्या आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास मध्य भारतातील किडनी प्रत्यारोपण होणारी सुपर स्पेशालिटी ही एकमात्र शासकीय संस्था ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मध्य भारतातील शेकडो रुग्णांचे जीव वाचविणे शक्य होणार असल्याचे बोलले जाते.

शस्त्रक्रियागार तयार -डॉ. श्रीगिरीवार
किडनी प्रत्यार्पनाकरिता विशिष्ट शस्त्रक्रियागाराची गरज आहे. सुपरला ते तयार झाले असून त्यात किडनी दान करणाऱ्यासह ती प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णाकरिता दोन स्वतंत्र विशिष्ट टेबल लावण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक महत्त्वाचे पत्र येताच या किडनी प्रत्यार्पनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, अशी माहिती सुपरचे विशेष कार्य. अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी व्यक्त केले.

प्रत्यारोपण लवकरच -डॉ. निसवाडे
किडनी प्रत्यारोपणाकरिता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काही प्रक्रिया पूर्ण होताच सुपरला किडनी प्रत्यारोपणाचे काम सुरू केल्या जाईल. निश्चितच त्याने किडनीच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे मत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले.