३१० गावांतील भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट; उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसणार
गेल्या वर्षी झालेला समाधानकारक पाऊस आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याने गेल्या पाच वषार्ंच्या तुलनेत यंदा विदर्भाला पाणीटंचाईची थोडीच झळ बसणार आहे. यंदा विदर्भातील ३१० गावांतील भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे आढळून आल्याने या गावांना मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
गेल्या वर्षी विदर्भातील सुमारे ६ हजारांवर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली होती. ही टंचाई कमी करण्यासाठी शासनाने मोठय़ा प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा केला. त्यासाठीच शासनाने जलयुक्त शिवार मोहीम हाती घेतली. या माध्यमातून लोकसहभागातून मोठय़ा प्रमाणात तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण, पाझर तलाव, शेततळे, सिमेंट बंधारे, अशी कामे हाती घेतली. यामुळे पावसाळ्यात पाणी जमिनीत जिरून भूजल पातळी वाढण्यास मदत झाली.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाचा तुलनात्मक अभ्यास केला. पाणलोट क्षेत्रातील ३ हजार, ९२० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. ऑक्टोबर २०१६ मधील निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीचा मागील पाच वर्षांतील ऑक्टोबरमध्ये सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास केला. यात २० टक्क्यांपेक्षा जास्त पावसातील तूट व एक मीटरपेक्षा जास्त भूजल पातळीत घट आढळून आलेल्या विदर्भातील गावांची संख्या ३१० एवढी आहे. यात अकोला जिल्ह्य़ातील सर्वाधिक १०३ गावांचा समावेश आहे. भूजल पातळीत शून्य ते एक मीटरने घट आढळून आलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता कमी असते. ती नियंत्रित ठेवण्यासारखी असते, पण एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आलेल्या गावांना मात्र टंचाईची झळ बसणार आहे. भूजल पातळी खोल जाण्याची कारणे प्रामुख्याने कमी पर्जन्यमान, भूजलाचा बारमाही पिकांसाठी होणारा अतिवापर, पिकांसाठी पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती, पर्जन्यमानाची तीव्रता व कालावधी, भूजल व्यवस्थापनाचा अभाव अशी आहेत.
भूजल पातळी घट झालेली गावे
जिल्हा – गावे
अकोला – १०३
नागपूर – ७१
भंडारा – ५६
अमरावती – ३६
गडचिरोली – २२
बुलढाणा – १७
यवतमाळ – ०३
चंद्रपूर – ०१
वर्धा – ०१
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 4:25 am