रसवंती केंद्र, आठवडी बाजार बंदीमुळे उचल कमी

नागपूर : टाळेबंदीच्या काळात आठवडी बाजार बंद असल्याने तसेच किरकोळ विक्रीची दुकाने मर्यादित काळापर्यंतच सुरू राहात असल्याने  ठोक बाजारातून आंब्याची उचल निम्म्याने घटली असून दरातही  घसरण झाली आहे. याचा फटका विक्रेते आणि उत्पादकांना बसला आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून करोना टाळेबंदीला सुरुवात झाली. या काळात फळविक्रीची दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहत होती. पण एप्रिल महिन्यात लागू करण्यात आलेल्या कडकडीत टाळेबंदीत दुकानांची वेळ सकाळी ८ ते११ पर्यंत ठेवण्यात आली. त्यामुळे विक्री घटली. याचा फटका ऐन हंगामात आंबे बाजाराला बसला.

नागपूर कळमना  बाजारात देशभरातील फळ विक्रीसाठी येतात. आंबा त्याला अपवाद नाही. रसाचे आंबे तेलंगणासह  इतर राज्यातून नागपुरात येतात. तेथून विदर्भातील विविध जिल्ह्यांत विक्रीसाठी जातात. नागपुरात दररोज साधारणपणे १०० टन आंबा येतो. दरवर्षी उन्हाळ्यात विक्री जोरात होते. मात्र मागच्या वर्षी आणि यंदा करोना टाळेबंदीचा फटका या व्यवसायाला बसला. टाळेबंदी पूर्वी आंब्याचे दर घाऊक बाजारात २५ हजार ते ३५ हजार रुपये प्रतिटन होते. त्यात आता ते कमी  होत २० हजारावर आले, असे नागपूर जिल्हा फळविक्रेता संघटनेचे श्री. छाबराणी यांनी सांगितले. ते म्हणाले, सकाळी ८ते ११ या वेळेतच बाजार सुरू असतो. फळ विक्रेत्यांसाठी ही वेळ फारच कमी आहे. याशिवाय ज्यूस सेंटर बंद आहे. एकीकडे मर्यादित विक्री आणि दुसरीकडे आंब्याचे उत्पादन अधिक झाल्याने आवकही वाढली. त्यामुळे दरात घसरण झाली. रोज बाजारात येणाऱ्या एकूण मालापैकी ६० टक्केही मालाची उचल होत नाही. त्यामुळे दर घसरण झाली.

किरकोळ बाजार सध्या आठ ते अकरा वाजेपर्यंत सुरू असतात. शासनाने ही वेळ वाढवून आठ तासाची करावी, याशिवाय ज्यूस सेंटरवरील बंदी उठवावी, तरच आंब्याची मागणी वाढेल व बाजारात तेजी येईल.

– श्री. छाबराणी, अध्यक्ष फळविक्रे ता संघटना, नागपूर