• सरकारने प्रणाली लादली, व्यापाऱ्यांचा आरोप
  • मागच्या तारखेत आजचा व्यवहारू

नव्या कर प्रणालीसाठी छोटे व्यापारी तयार आहेत किंवा याची तपासणी न करताच वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केल्याने छोटय़ा व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. ही करप्रणाली आमच्यावर लादण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, बाजारपेठांवरही नव्या करप्रणालीचा परिणाम झाला असून व्यवहार ठप्प झाले आहेत.

जीएसटीमुळे सर्व काही चांगले होणार असेच चित्र देशात रंगवण्यात आले. वास्तविक ५० वर्षांपासून पारंपरिक चोपडीवर व्यवहाराची नोंद करणारे व्यापारी अचानक संगणकाकडे कसे वळतील याचा विचार सरकारने केला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मस्कासाथमधील व्यपाऱ्यांनी दिली. इतवारीत गेल्या ५० वर्षांपासूनची ‘चोपडी’ची परंपरा मोडीत काढून संगणकावर सर्व व्यवहार करण्याची व्यापाऱ्यांची मानसिकता नाही. सरकारने केवळ त्यांची तयारी पूर्ण केली, व्यापाऱ्यांच्या तयारीचा विचार केला नाही. सरकारने नवी प्रणाली लादून व्यापाऱ्यांवर अन्याय केला, असे मत नागपूर इतवारी किराणा र्मचट असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंग यांनी व्यक्त केले.

जीएसटी लागू होऊन पाच दिवस झाले असले तरी व्यापारी संभ्रमित आहेत. कोणत्या वस्तूवर किती कर आणि ग्राहकांकडून त्याची वसुली याची योग्य माहिती व्यपाऱ्यांकडे नाही. जीएसटी लागू होताच महागाई वाढेल, या अफवेपोटी अनेक व्यापाऱ्यांनी १ जुलैपूर्वी मोठय़ा प्रमाणात माल खरेदी केला. मात्र, जीएसटीमुळे काही वस्तूंवरील कर कमी झाले, तर काहींचे कर वाढल्याने व्यापारी अडचणीत आले. सुपारीवर ६ टक्के कर होता आता तो ५ टक्के झाला. अशावेळी जुना माल कोणत्या भावाने विकायचा, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. संगणक व्यवसायात कमालाची मंदी आली आहे.

संगणकाच्या सुटय़ा भागांच्या दराबाबत व्यापारी अजूनही अनभिज्ञ आहेत. ठोक व्यवहार सोडला तर इतर वस्तूंचे भाव जीएसटीप्रमाणे काय असावे हे कंपनी व डिलर्सनेच स्पष्ट केले नाही, त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार थांबले आहेत, असे कॉम्प्युटर केअरचे संचालक मुकेश खडतकर यांनी सांगितले.

सरकारने १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली, मात्र व्यापाऱ्यांना नोंदणी क्रमांकच २ तारखेला मिळाले. सरकार याबाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. काही व्यापारी जीएसटीसाठी सज्ज असल्याचे सांगून स्वार्थ साधत आहे, अशी टीका कच्चा मसाल्याचे ठोक विक्रते चंदन गोस्वामी यांनी केली.

शिल्लक मालाचीच विक्री

जीएसटीच्या पाच टप्प्यात कोणत्या वस्तूंवर किती कर आकारायचा हे स्पष्ट करण्यात आले असले तरी यात काही नव्या वस्तूंचाही समावेश आहे. त्यावरील कराबाबत व्यापाऱ्यांमध्ये स्पष्टता नाही. बाजारपेठेचा अढावा घेतला असता जीएसटी लागू झाल्यावरही व्यापारी जुन्याच पद्धतीने व्यवहार करत असल्याचे दिसून आले. जीएसटीपूर्वी खरेदी केलेला माल शिल्लक असल्याने त्याचीच विक्री छापील किंमतीनुसार सुरू आहे. काही व्यापाऱ्यांनी मागच्या तारखेत आजचे व्यवहार दर्शविण्याचा सपाटा सुरू केला आहे.

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट!

जीएसटीचा बाजारपेठांवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. तेथे शुकशुकाट दिसून आला. करमुक्त वस्तूंवर नव्या प्रणालीत किती कर आकारायचा, याची नेमकी माहिती नसल्याने व्यापार ठप्प झाले आहेत. गुजरातमध्ये कापड व्यापाऱ्यांनी जीएसटीच्या विरोधात संप पुकारल्याने तेथून येणारा माल थांबला. अगरबत्ती, कापूर कर मुक्त होते आता ५ टक्के कर लागल्याने व्यापाऱ्यांनी त्याची खरेदी थांबवली. मेथी, धणे पूर्वी भाज्यांमध्ये मोजले जायचे आता ते जीएसटीच्या कक्षेत आले.