पालकमंत्री नितीन राऊत यांचा सवाल, गडकरींचे सडेतोड प्रत्युत्तर

नागपूर : फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपुरात मोठे उद्योग का आले नाहीत, असा सवाल पालकमंत्री  व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. यावेळी व्यासपीठावर खुद्द फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. राऊत यांच्या आरोपाला गडकरी यांनी सडेतोड उत्तर दिले.

महामेट्रोच्या ‘अ‍ॅक्वालाईन’ मार्गाच्या उद््घाटन समारंभात राऊत बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख व दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार गडचिरोली जिल्ह्य़ातील उभारत असलेल्या लोहखनिज प्रकल्पाचा मुद्दा मांडत असताना त्याला केंद्र सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोठय़ा उद्योगाशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही, याकडे लक्ष वेधताना राऊत यांनी माजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघत त्यांच्या काळात नागपुरात मोठे प्रकल्प का आले नाहीत, असा सवाल केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहानमध्ये ५० हजार तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

फडणवीस यांचे भाषण झाल्याने त्यांना राऊत यांना प्रत्युत्तर देता आले नाही. मात्र गडकरी यांनी ही संधी सोडली नाही. विकासाच्या कामात राजकारण आणत नसल्याचे सांगत त्यांनी आपण २८ हजार तरुणांना मिहानमध्ये रोजगार दिला. त्याची यादी माझ्याकडे आहे. तसेच फाल्कन आणि राफेल या विमानाचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांचे काम सुरू झाले आहे.  विविध कंपन्यांमध्ये हजारो तरुण काम करीत आहेत. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केले. नागपूरमध्ये सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. आता यापुढची जबाबदारी नागपूरचे पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांची व जिल्ह्य़ातील मंत्री म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची आहे. त्यांना नागपूरच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे गडकरी म्हणाले.