गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत आरक्षणासाठी सुरू असलेले पटेल आंदोलन संपले असून त्याचा गुजरातच्या स्थानिक स्वराज्य किंवा आगामी निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे मत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी व्यक्त केले.

अ‍ॅग्रोव्हिजनच्या निमित्ताने मुख्यमंत्री विजयभाई रूपानी येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळल्यावर राज्याच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. पटेल आंदोलन संपल्यागत असून त्याचा कुठलाही परिणाम निवडणुकीवर पडणार नाही.

गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसह  किंवा पोटनिवडणुका झाल्या. मात्र, त्यात भाजपचे उमेदवार निवडून आले आहे. पटेल आंदोलनाचा निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नसून पुन्हा एकदा भाजपच सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बदलण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून देशातील अर्थव्यवस्था त्यामुळे सुधारेल आणि काळा पैसा मोठय़ा प्रमाणात बाहेर येईल. गुजरातसह अन्य राज्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शेतीसाठी जलसंधारण, मिथेनॉल, बायोटेक्नॉलॉजीसारख्या अनेक चांगल्या योजना राबविल्या जात असताना गुजरातमध्ये त्या राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रूपानी यांनी सांगितले.

.. हे तर काळापैसा साठविणाऱ्यांचे समर्थनच

या नोटा बदलण्याचे देशभरातील जनतेने स्वागत केलेले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी विरोध करून काळा पैसा साठविणाऱ्यांचे एक प्रकारे समर्थनच केले आहे. या निर्णयामुळे देशातील दहशतवादी व नक्षलवाद्यांकडे असलेला जो काळा पैसा वापरला जात होता त्याला आळा बसेल. या निर्णयामुळे सामान्यांना अजून काही दिवस त्रास सहन करावा लागेल. मात्र, सरकारने या निर्णय घेतल्यानंतर तशा सोयी सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत त्यामुळे जनतेने सरकारला सहकार्य केले पाहिजे. भविष्यात जनतेला या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.