News Flash

गुजरातच्या धक्कादायक निकालाने राज्य सरकारचीही झोप उडाली

गुजरात निवडणुकीच्या सतत उत्कंठा वाढविणाऱ्या निकालाकडे आज सत्ताधारी आणि विरोधकाचे लक्ष लागले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मंत्र्यांना कारभार सुधारण्याचा स्वपक्षीय आमदारांचा सल्ला

गुजरात विधानसभा निवडणुकीत सलग पाचव्यांदा विजयाची गुढी उभारण्यात भाजपला यश मिळाले असले तरी काँग्रेसने मिळविलेले दणदणीत यश आणि भाजप आमदारांच्या संख्येत झालेली घट यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांची पुरती झोप उडाल्याचे चित्र सोमवारी विधानभवन परिसरात पाहायला मिळाले. भाजपाने घोषणाबाजी करीत आणि एकमेकांना पेढे भरवत विजयोत्सव साजरा केला. मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी उडविलेली झोप आणि आता आलेले धक्कादायक निकाल यापासून वेळीच बोध घेऊन राज्यातील मंत्र्यांनी आपला कारभार सुधारायला हवा नाहीतर राज्यातही वेगळे चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही अशी भितीयुक्त चर्चा भाजप आमदारांमध्येच सुरू होती.

गुजरात निवडणुकीच्या सतत उत्कंठा वाढविणाऱ्या निकालाकडे आज सत्ताधारी आणि विरोधकाचे लक्ष लागले होते. सर्वच पक्ष कार्यालये आणि मंत्र्यांच्या दालनात निकालाचीच चर्चा रंगली होती. सुरूवातीस काँग्रेसने भाजपाला मागे टाकल्याचे चित्र दिसू लागताच भाजपच्या मंत्र्यांची अस्वस्थतात अधिकच वाढली. मात्र पक्षाला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी विधानभवन आवारात घोषणाबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. त्यानतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या विजयोत्सवात आमंत्रित करण्यात आले. पंतप्रधान मोदी हेच देशाचा विकास करू शकतात हा विश्वास आजच्या निकालांनी अधोरेखित झाल्याचे पहायला मिळाले असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना दिले. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतदारांनी भाजपला दिलेला कौल हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर दाखविलेला सार्थ विश्वास आहे. विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला जनतेने दिलेली ही पावती आहे. गुजरातमध्ये२२ वर्षांंपेक्षा जास्त काळ सत्तेत असताना पक्षाला सुमारे ५० टक्के मतदारांची पसंती मिळणे, यामुळे हा विजय विशेष महत्वाचा ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपाचे आमदार, मंत्री आणि कार्यकर्ते उसने अवसान आणून एकमेकांना पेढे भरवत होते, मात्र अनेकांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. भाजपा कार्यालयातही दिवसभर निकालाबाबतही उलटसुलट चर्चा सुरू होती. मागच्या वेळीचा आकाडा तरी गाठू ना असे कार्यकर्ते परस्परांना दबक्या आवाजात विचारत होते. माध्यमांसमोर हसरे चेहरे दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयघोष करणारे आमदार आपापसात मात्र असाच कारभार सुरू राहिला तर आपलेही काही खरे नाही, मुख्यमंत्री साहेबांनी आता हातात हंटर घ्यायलाच हवा अशी चर्चा करीत होते. आजचा निकाल हा आमच्यासाठी इशारा आहे, लोकांची कामे होत नाहीत अशा तक्रारी आम्ही सातत्याने करीत आहोत. मंत्री केवळ आश्वासनांवर बोळवण करीत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे, मोदीजी आणि फडवणीस साहेबांच्या नावावर किती दिवस मते मागायची. जाहीर बोलायचे म्हटल्यास  पक्षाकडून कारवाई होण्याची भिती, त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही, आता तरी मंत्र्यांनी आपला कारभारावा अशा शब्दात भाजपच्या काही आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे मंत्र्या-मंत्र्यांमध्येही आपले काय होणार, काँग्रेसने तर सगळ्यानाच कामाला लावलेय अशी कुजबुज सुरू होती.

याउलट काँग्रेस- राष्ट्वादी काँग्रेसच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र कमालीचा जोष होता. सभागृहातही विरोधकांनी आज विविध मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. आता बघा काय होते पुढच्या निवडणुकीत असे काँग्रेस आमदार आत्मविश्वासाने सांगत होते. राष्ट्रवादीचे आमदार राहुल गांधीच्या नेतृत्वाचे उघडपणे कौतुक करीत होते. गुजरात निवडणुकीने राहुल गांधीचे प्रगल्भ नेतृत्व समोर आले असून सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाचा पराभव अटळ असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुढील विधानसभा निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणीही त्यांनी केली. भाजपाविरोधात सर्वत्र रोष दिसत असताना हे निकाल ज्या पध्दतीने आले आहेत त्याचा अर्थ निवडणूक व्यवस्था बदलणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तर मला लाजिरवाणा पराभव माहीत होता परंतु आज गुजरातमध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये मी लाजिरवाणा विजय पाहिला असा चिमटा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. जो गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्या गुजरातमध्ये लोकांनी त्यांची वाईट अवस्था केली आहे. त्यामुळे तुम्ही वेळीत सुधारा, इथे मोदींची अस्मिता वाचवायला येणार नाही. इथे तुम्हालाच लढायचे आहे अशी खोचक टीका मुंडे यांनी केली. मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची वल्गना केली होती. पण त्यांच्या राज्यातच भाजपला पुन्हा सत्ता स्थापण्याची निसटती संधी मिळाली, हा मतदारांचा कौल भाजपने लक्षात घेतला पाहिजे. हा जनतेचा इशारा आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:42 am

Web Title: gujarat election result 2017 maharashtra government
Next Stories
1 कारवाईच्या नावाखाली कोटय़वधींची वसुली
2 संत्री निर्यातीसाठी विदर्भात दोन प्रकल्प
3 राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात दीनदयाल थाळी उपक्रम – मुख्यमंत्री
Just Now!
X