शरद पवार यांचा नागपुरात हल्लाबोल; सरकारशी असहकार पुकारण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

राज्यातील ३९ हजार शेतकऱ्यांकडील सुमारे २२ हजार कोटी रुपयांची कृषीपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्य सरकार नवनवीन मार्गाचा अवलंब करीत असतानाच, ‘संपूर्ण कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय सरकारचे एकही देणे देऊ नका,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांना चिथावणी देत फडणवीस सरकारची कोंडी केली. दमबाजीच्या माध्यमातून किंवा कोणाला तुरुंगात टाकून जनआक्रोश दाबून टाकण्याची भाषा मुख्यमंत्री करणार असतील तर त्यांचे सरकारच उलथवून टाकू, असा गर्भित इशाराही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, आरपीआय, समाजवादी पक्ष, माकप आदी विरोधी पक्षांच्या वतीने विधानभवनावर संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मॉरिस कॉलेज चौकात या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करीत सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सरकारला घेरण्याचे संकेत दिले. व्यासपीठावर काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी नेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार आदी उपस्थित होते.

बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि झोपलेल्या सरकारला हल्लाबोल करून जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून तरीही सरकार जागे होत नसेल तर संधी मिळेल तेव्हा हे सरकारच उलथवून टाकू असा इशारा पवार यांनी यावेळी दिला. जोवर संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोवर वीज बिल, सोसायटय़ांची देणी आणि  सरकारची इतर कोणतीही देणी भरायची नाहीत, सरकारशी असहकार करा असेही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.

देशातही सध्या वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न आ वासून उभे आहेत. तरी देशाला वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्र सरकारकडून जनतेच्या मनात संशयाचे वातावरण तयार केले जात असून लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, रोजगाराचे प्रश्न सोडवायचे नाहीत, सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या सज्जन माणसाला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानचा उल्लेख करायचा, याची शरम वाटली पाहिजे, हे देशाच्या हिताचे नाही, अशा कडवट शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. अशा प्रकारचे वक्तव्य करून पंतप्रधानांनी देशाची परंपरा उद्ध्वस्त करण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील कर्जमाफीबद्दल पवार म्हणाले, की भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, साडेतीन वर्षे झाली तरी अजून कर्जमाफीचा पत्ता नाही. सगळ्या बाजूने संकटे वाढत असताना सरकारकडून मदत केली जात नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी सुद्धा यांच्या अंत:करणाला पाझर फुटत नाही, हे दुर्दैवी आहे. आमच्या सरकारच्या काळात अवघ्या १५ दिवसांत शेतकऱ्यांची ७० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. फडणवीस मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पैसे देतो म्हणून सांगत आहेत. एवढेच नव्हे तर दमदाटीची भाषा करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्यामुळेच हा जनआक्रोश निर्माण झाला असून तो गावागावात जाऊ द्या, असे आवाहन गुलाम नबी आझाद यांनी केले. आता हा हल्लाबोल संसदेत केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा आरोप मोहन प्रकाश यांनी केला.

दोन्ही काँग्रेसला वेध ऐक्याचे

मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादाने भारावलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तुम्ही अशीच साथ द्या आम्ही एकत्र येऊ आणि राज्यात सत्तांतर घडवून आणू अशी ग्वाही दिली. त्याला राष्ट्रवादीकडूनही तसाच प्रतिसाद मिळाला. दोन्ही पक्षांनी मोठे मन दाखविल्यास आणि जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ात दोघांनी एकमेकांना साथ दिल्यास राज्यात परिवर्तन नक्की होईल, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे घेणार !

केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम येत्या ३ जानेवारी रोजी पुणे येथे होणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पवारांना ‘बोलते’ करणार आहेत. ही मुलाखत ‘मॅच फिक्सिंग’ असणार नाही, तर कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘ठाकरी भाषेत’ राज हे प्रश्नांची गोलंदाजी करणार आहेत.