कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड तालुक्यातील कानूरबुद्रक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात आठवीच्या विद्यार्थिनीला ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांनी दिली. हा गंभीर प्रकार निदर्शनात आल्यानंतर या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागवण्यात आला. यानंतर मुख्याध्यापिका देवण यांचे वेतन रोखण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

विधानभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. न्यायालयाने शिक्षक भरतीस विलंब टाळण्यासाठी कमी वेळेत अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतून आवश्यक शिक्षक संबंधित संस्थांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार संस्थेतील रिक्त पदानुसार शिक्षक उपलब्ध करण्यात आले. मुंबईच्या चेंबूरमधील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात करण्यात आले. नागपूर जिल्ह्य़ातील शिक्षक हे भाषा व समाजशास्त्र विषयाचे होते, तर काही शिक्षक विज्ञान विषयाचे आहेत. मात्र, गणित विषयासाठी नागपूर विभागात किंवा जवळपासच्या विभागात उपलब्ध नसल्यामुळे संबंधित शिक्षण संस्थेस मुंबई येथून शिक्षक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली. दरम्यान, शिक्षक आमदारांवरही तावडे यांनी टीका केली.