पुलगावच्या घटनेनंतरही नागपूरला दक्षतेची सूचना नाही
शासनाकडून आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज असल्याचा दावा नेहमीच केला जातो. परंतु आरोग्य विभाग त्यापासून कोसो दूर आहे. नागपूरच्या हिंगण्यातील अनेक विद्यार्थ्यांना २० फेब्रुवारी २०१६ रोजी विषबाधा झाल्यावर नागपूरच्या एकाच रुग्णालयात उपचाराकरिता कोंबल्याची घटना उघड झालेली असतांनाही त्यापासून या विभागाने काहीच धडा घेतलेला नाही. वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडार (सीएडी कॅम्प)मध्ये घटना घडल्यावरही नागपूरच्या एकाही रुग्णालयाला मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत दक्षतेची सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे विभागावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात नैसर्गिक वा इतर कारणाने अचानक मोठी दुर्घटना घडून मोठय़ा संख्येने रुग्ण वाढल्यास त्यांना त्वरित उपचार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात अग्निशमन दलासह विविध विभागातील स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा २४ तास तैनात केल्याचा दावा वारंवार राज्य शासनाकडून केला जातो. त्याकरिता आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कार्यशाळा आयोजित करण्यासह सगळ्याच विभागात समन्वय साधून बऱ्याचवेळा विविध ‘मॉक ड्रिल’ही घेतली जाते. प्रत्येक वर्षी बऱ्याचवेळा ही प्रक्रिया केली जात असल्याने कोणत्याही जिल्ह्य़ात काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने हे विभाग नियोजनबद्धरीत्या कामाला लागणे अपेक्षित आहे.
या सगळ्या विभागात समन्वयच राहत नसल्याचे चित्र पुन्हा वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव येथे घडलेल्या घटनेतून पुढे आले आहे. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान अचानक आग लागली. त्यात येथे संग्रहित करून ठेवण्यात आलेल्या दारुगोळ्यांचे मोठय़ा प्रमाणावर स्फोट सुरू झाले. त्यामुळे या कॅम्प परिसरातील गावांमध्ये हादरे बसत होते. या घटनेत मोठय़ा संख्येने डिफेन्स सिक्युरेटी क्रॉप्सच्या जवानांचा मृत्यू तर अनेक जवान व कर्मचारीा गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या सगळ्यांना तातडीने उपचाराकरिता सावंगी आणि सेवाग्रामच्या रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
स्थानिक प्रशासनाकडून या तिन्ही रुग्णालयांना सज्ज राहण्याची सूचना देण्यात आली. यात मोठय़ा प्रमाणावर भाजलेले रुग्ण पुढील चांगल्या उपचाराकरिता नागपूरला हालवण्याची शक्यताही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. तेव्हा तेथील प्रशासनाकडून तातडीने आपत्कालीन व्यवस्थपान म्हणून नागपूरच्या मेडिकल, मेयोसह इतर मोठय़ा खासगी रुग्णालयांना सूचना देणे अपेक्षित होते. परंतु मंगळवारी ३१ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील एकाही शासकीय व खासगी रुग्णालयांना सूचना नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. मेडिकल व मेयोच्या अधिष्ठात्यांनी सूचना नसल्याचे मान्य केले. घटनेचे गांभीर्य बघता डॉक्टरांसह इतर सगळीच पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली होती. परंतु या घटनेमुळे पुन्हा आपत्कालीन व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय अपेक्षित होते?
पुलगावच्या घटनेनंतर तेथील स्थानिक प्रशासनाने सेवाग्राम, सावंगीसह जिल्हा रुग्णालयाला त्वरित दक्षतेची सूचना दिली असली काही रुग्णांना नागपूरला हलवण्याची शक्यता बघता नागपूरच्या मेडिकल, मेयोसह इतरही शहरातील मोठय़ा खासगी रुग्णालयांना आपत्कालीन व्यवस्थापनानुसार दक्षतेची सूचना देणे अपेक्षित होते. जेणेकरून गंभीर रुग्णांना नागपूरला हलवण्यापूर्वीच येथे सगळी व्यवस्था उपलब्ध राहणे अपेक्षित होते. परंतु तसे न करण्यासह येथे सूचनाही दिली नाही. जर रुग्ण येथे हलवले व व्यवस्था नसल्यास रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हिंगणा येथील घटनेपासूनही धडा नाही
नागपूर जिल्ह्य़ातील हिंगणा येथील शांती निकेतन उच्च प्राथमिक शाळेत २० फेब्रुवारी २०१६ रोजी शंभराहून जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या रुग्णांना नागपूरच्या मेडिकल प्रशासनाला सूचना न देताच हलवण्यात आल्याने एकाच वार्डात एका खाटेवर दोन ते तीन मुले ठेवून उपचाराची पाळी प्रशासनावर आली. सुरवातीला डॉक्टर नसल्याने उपचाराकरिता अनेक तासांचा विलंब झाला. याप्रसंगी आपत्कालीन व्यवस्थापनात आढळलेल्या त्रुटी अद्यापही दूर केलेल्या नसल्याचे या घटनेतून पुढे आले आहे.