‘ऑक्सिजन’चा अत्यल्प साठा; सर्वसामान्य रुग्णांचा जीव टांगणीला

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील एका रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठय़ाअभावी शंभरावर मुलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या घटनेतून काहीही धडा अद्यापही शासनाने घेतलेला नाही. विदर्भातील आरोग्य सेवेची जबाबदारी असलेल्या सहा जिल्हा रुग्णालये, चार स्त्री रुग्णालये सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतही पर्याप्त सोयी नाहीत. अत्याधुनिक सुविधांसह अतिदक्षता विभागाच्या पर्याप्त खाटाही नाहीत. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला आहे. या रुग्णालयांत केवळ दीड ते पाच दिवस पुरेल एवढाच ‘ऑक्सिजन’चा साठा आहे, हे विशेष.

नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. परंतु विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या सगळ्याच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांतून अत्यवस्थ रुग्ण नागपूरच्या मेडिकल, मेयोसह विदर्भातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत उपचाराकरिता पाठवले जातात. ‘टर्शरी केअर’चा दर्जा असलेली ही रुग्णालये असल्याने असे होत असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात. विदर्भातील या रुग्णालयांपैकी चंद्रपूर, गोंदिया येथील रुग्णालयांत साधे अतिदक्षता विभागही नाहीत. नागपूरच्या सुपरस्पेशालिटीत सर्वाधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण होते, परंतु येथेही अतिदक्षता विभाग नाही.

नागपूरच्या मेडिकल, मेयो, अकोला, यवतमाळ येथे अतिदक्षता विभागात दीडशे खाटा असल्या तरी रुग्णांचा भार बघता त्या तोडक्या आहेत. विदर्भातील सहाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत जीवनरक्षणप्रणाली उपकरणांची कमतरता, दीड ते दोनच दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा, विशेष कौशल्य असलेल्या बऱ्याच विभागाच्या डॉक्टरांचा अनुशेष, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे स्वच्छतेचा प्रश्न, औषधांचा तुटवडा असतो. या रुग्णालयांत रुग्णांचा भार बघता उपलब्ध खाटा कमी आहेत. सर्वत्र सिटी स्कॅन असले तरी नागपूरचे मेडिकल वगळता इतर कुठेही एमआरआय मशीनही नाही. त्यामुळे साध्या तपासणीही होत नाहीत.

विदर्भातील भंडारा, गडचिरोली, वर्धा, वाशीम, बुलढाणा, अमरावती या जिल्हा रुग्णालये आणि नागपूर, गोंदिया, यवतमाळ, अकोला या स्त्री रुग्णालयांतही स्थिती वेगळी नाही. जिल्हा रुग्णालयांत ७ ते १० अतिदक्षता विभागाच्या खाटा असल्या तरी नागपूर आणि अकोल्याच्या स्त्री रुग्णालयांत या खाटाच नाही. त्यातच आरोग्य सेवेच्या रुग्णालयांत सुमारे पाच दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असतो. त्यातच सर्वच संस्थांत काही तपासण्या उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांचे अचूक निदानही वेळेवर होत नाही. या सर्व समस्या बघता विदर्भातील शासकीय रुग्णालयांत सोयी-सुविधाच कमी असल्यामुळे विविध आजारांसह बाल व माता मृत्यूंवर नियंत्रण मिळणार कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नवजात शिशूंच्या जीवनरक्षणप्रणालीची वानवा

विदर्भात नागपूरचे मेडिकल वगळता कोणत्याही शासकीय रुग्णालयांत जन्मजात अत्यवस्थ बालकांच्या जीवनरक्षणप्रणालीचे विशिष्ट व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. डागात हे उपकरण असले तरी काह तांत्रिक कारणाने ते न वापरता रुग्ण मेडिकलमध्येच पाठवले जातात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर अभ्रक मृत्यू होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात.

विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत काही असुविधा असल्या तरी डॉक्टर पूर्ण क्षमतेने सेवा देत आहेत. हे दृश्य बदलण्याकरिता सर्व संस्थांच्या विकासाचा आराखडा शासनाने तयार केला आहे. त्यानुसार नागपूरच्या मेडिकल आणि इतर संस्थेत अतिदक्षता विभागाच्या खाटा वाढवणे, ऑक्सिजन निर्मिती आणि इतर प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्राधान्याने मंजूर केले आहेत. लवकरच येथे अद्ययावत सुविधा मिळतील.

डॉ. अभिमन्यू निसवाडे,  नोडल अधिकारी, वैद्यकीय शिक्षण विभाग.