तज्ज्ञ डॉक्टर मिळाले; पहिल्या टप्प्यात बाह्य़रुग्ण विभागात सेवा

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर :  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आता हृदयरोग, मूत्रपिंडाशी संबंधित आजार आणि श्वसन व छातीशी संबंधित आजाराच्या रुग्णांवरही  उपचार होणार आहेत. तिन्ही विभागाचे डॉक्टर एम्सला रूजू झाले असून पहिल्या टप्प्यात या विभागाच्या बाह्य़रुग्ण विभागातील सेवा सुरू होईल. दुसऱ्या टप्यात  आंतरुग्ण विभागाच्याही सेवा मिळणार आहेत.

एम्सकडून क्लिनिकल संवर्गातील बऱ्याच विभागाच्या निवड प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. ती पूर्ण झाल्यामुळे आता येथे मूत्रपिंड विभागाचे डॉ. आनंद चेलाप्पन, हृदयरोग विभागाचे डॉ. सागर माकोडे, श्वसनरोग व छातीरोग विभागाचे डॉ. सत्यजित साहू हे तज्ज्ञ डॉक्टर रूजू झाले आहेत.

यापैकी डॉ. सागर माकोडे यांनी हृदयाच्या बाह्य़रुग्ण विभागात सेवा देणे सुरू केले असून येथे इको यंत्र पोहचल्याने त्याच्याही तपासण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयानंतर एम्स हे या तीन आजारांवर सेवा देणारे नागपुरातील दुसरे शासकीय रुग्णालय असणार आहे. येथे या विभागाच्या सेवा दारिद्रय़रेषेखालील रुग्णांना नि:शुल्क तर इतरांना माफक दरात मिळेल. एम्स रुग्णालयात सध्या औषध वैद्यकशास्त्र, शल्यक्रियाशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, बालरोग विभाग, कान- नाक- घसा रोग विभाग, नेत्ररोग विभाग, बधिरीकरणशास्त्र विभाग, अस्थिरोग विभागाच्या सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, येथे प्राथमिक स्वरूपात डे- केअर सेवा म्हणून काही प्रमाणात रुग्णांवर दाखल करून उपचार करणे सुरू झाले होते. परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे करोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सोय केली गेले. सध्या बाधितांसाठी एम्सला सुमारे ८० खाटा उपलब्ध आहेत.

९२१ करोनाग्रस्तांवर उपचार

एम्सला आजपर्यंत ९२१ करोनाबाधित  उपचासाठी आले. त्यातील ६१० करोनामुक्त झाले असून १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. येथे २७ जोखमेतील रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून येथे आलेले २६५ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. रुग्णालयात सध्या विविध विषयांच्या बाह्य़रुग्ण विभागांतील सेवा सुरू असून काही प्रमाणात आता किरकोळ शस्त्रक्रियाही सुरू झाल्या आहेत. लवकरच येथे मूत्रपिंडाच्या रुग्णांचे डायलेसिस सुरू होणार असून त्यासाठी आवश्यक यंत्र येथे पोहचले आहेत.

एम्समध्ये हृदय, मूत्रपिंड, श्वसनाशी संबंधित आजारावर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर रुजू झाले असून त्यासाठी एम्सच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी पुढाकार घेतला होता. एम्समध्ये सध्या करोनाबाधितांवर दाखल करून उपचाराची सोय आहे. पुढच्या टप्यात इतरही विषयातील रुग्णांना दाखल करून उपचाराची सोय करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत.

– डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स, नागपूर.