डॉ. निकुंज पवार नसल्याने आता तज्ज्ञ डॉक्टराचा पेच

नागपूर :  सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हृदय  प्रत्यारोपण केंद्रासाठी अखेर मंजुरी मिळाली आहे. या केंद्राचा प्रस्ताव पाठवताना हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून डॉ. निकुंज पवार यांचे नाव लिहिण्यात आले होते. परंतु डॉ. पवार हे कंत्राटी पद्धतीने सेवा देत होते. त्यांना सेवेतून कमी केल्याने आता तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे पुन्हा प्रत्यारोपणाचा प्रश्न कायमच राहण्याची शक्यता आहे.

हृदय निकामी झालेल्या रुग्णांसाठी प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय आहे. राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबाद आणि नागपुरात केवळ खासगी रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण होते. परंतु गरिबांनाही हा लाभ मिळावा, यासाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी तेव्हाचे हृदय शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. निकुंज पवार यांच्या सहकार्याने आरोग्य संचालक कार्यालयात या केंद्रासाठी प्रस्ताव  पाठवला होता.  हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून  डॉ. आनंद संचेती व सुपरमध्ये कार्यरत डॉ. निकुंज पवार हे सेवा देणार असल्याचे दर्शवण्यात आले होते.

दरम्यान, डॉ. निकुंज पवार हे कंत्राटी  असल्यामुळे येथे डॉ. सतीश दास यांची बदली झाल्यावर त्यांना सेवेतून कमी करण्यात आले.  डॉ. दास येथे असताना सुपरस्पेशालिटीत डॉ. आनंद संचेती सेवा देण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच डॉ. सतीश दास यांच्यावर तत्कालीन वैद्यकीय सचिवांनी येथील रुग्ण खासगी रुग्णालयात पळवण्याचा ठपका ठेवत त्यांची बदली केली. परंतु ते बदलीच्या ठिकाणी शेवटपर्यंत रुजू झाले नाही. आता त्यांची पुन्हा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात बदली झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत असतानाच  येथे  डॉ. संचेती व डॉ. पवार  यांना परत आणण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा काय उपाय शोधणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हाफकीनकडून अद्यापही यंत्राची खरेदी नाही

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण सुरू करण्यासाठी हाफकीनकडे प्रशासनाने दोन डायलिसीस मशीन, हृदयाच्या ठोक्?यांचा अचूक वेध घेणारे ‘इग्मो’, नायट्रिक ऑक्?साइड व्हेंटिलेटर, जंतुसंसर्ग टाळण्यासाठी पॉझिटिव्ह प्रेशर असलेला वॉर्ड आणि कार्डियाक बायोप्सी असे काही यंत्र खरेदीचा प्रस्ताव  पाठवला होता. परंतु करोनामुळे या यंत्राची अद्यापही खरेदी झाली नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कोणत्याही स्थितीत हृदय प्रत्यारोपण सुरू केले जाईल. त्यासाठी डॉ. निकुंज पवार यांचे मन वळवून त्यांना परत सेवेवर घेतले जाईल. ही सेवा सुरू झाल्यास मध्य भारतातील गरीब रुग्णांनाही उपचार मिळेल.

– डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.