न्यू ईरा रुग्णालयातील पहिल्या केंद्राला मंजुरी

उपराजधानीत मेंदूमृत रुग्णाच्या बुब्बुळ, मूत्रपिंड, यकृतनंतर हृदय प्रत्यारोपण करण्याचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. शहरातील   न्यू ईरा रुग्णालयात पहिल्या हृदय प्रत्यारोपण केंद्राला शासनाने मंजुरी दिली आहे.

देशात प्रत्येक वर्षी सुमारे ५० हजार व्यक्तींचे हृदय विविध कारणामुळे निकामी होतात. या रुग्णांना हृदय प्रत्यारोपणातूनच जीवदान मिळू शकते, परंतु महाराष्ट्रासह देशात फार कमी हृदय प्रत्यारोपण केंद्र आणि शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ आहेत. त्यामुळे केवळ ४०० च्या जवळपासच हृदय प्रत्यारोपणाच्याच शस्त्रक्रिया वर्षांला होतात. मध्य भारतात एकही केंद्र नसल्याने रुग्णाला देशाच्या विविध केंद्रात जाऊन प्रतिक्षा यादीत नोंद करावी लागते. ही यादी मोठी असल्याने हृदय प्रत्यारोपणाअभावी वर्षांला हजारो रुग्णांचा मृत्यूही होतो. महाराष्ट्रात या प्रकारची औरंगाबादला एक तर मुंबईत तीन तर पुण्यात दोन केंद्र आहेत. मध्य भारतात एकही केंद्र नसल्याने मेंदूमृत रुग्ण येथे आढळल्यास त्याचे हृदय विमानाने इतरत्र तेथील रुग्णांसाठी पाठवावे लागत होते.

हृदय काढल्यावर ते चार तासात प्रत्यारोपित होणे आवश्यक आहे. विलंब झाल्यास ते निकामी होते. त्यामुळे नागपूरहून अनेक मेंदूमृत रुग्णांचे हृदय प्रत्यारोपित केले जात नव्हते. येथील  न्यू ईरा रुग्णालयात प्रत्यारोपण केंद्र मंजूर झाल्याने आता येथेही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशात हृदय प्रत्यारोपणाच्या आजपर्यंत तीन हजार ५०० च्या जवळपास शस्त्रक्रिया झाल्याचा दावा न्यू ईरा रुग्णालयाचे संचालक व हृदय प्रत्यारोपण सर्जन डॉ. आनंद संचेती यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. या शस्त्रक्रियेसाठी पुणेचे मनोज दुराईराज आणि अहमदाबादचे डॉ. धवल नायक यांची या रुग्णालयाला मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला न्यू ईराचे संचालक डॉ. निधीश मिश्रा, संचालक डॉ. नीलेश अग्रवाल, संचालक डॉ. अमोल कोकास उपस्थित होते.

सात हृदय शहराबाहेर

नागपूरसह मध्य भारतात एकही हृदय प्रत्यारोपण केंद्र नसल्यामुळे वर्ष २०१३ पासून आजपर्यंत सात मेंदूमृत रुग्णांचे हृदय मुंबई, पुणे, औरंगाबादसह देशाच्या इतर केंद्रात गरजू रुग्णांसाठी पाठवण्यात आले आहे. त्यात नागपूरचे चार, सावंगी मेघे येथील एक, अमरावतीमधील दोन हृदयांचा समावेश आहे. ही संख्या वाढत असल्याने सामान्यांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती होत असल्याचे पुढे येत आहे.