१६ हजार मेगावॅट मागणीचीच नोंद
नागपूर : राज्यात ५ जुलै रोजी विजेची मागणी २० हजार ६०० मेगावॅटपर्यंत नोंदवली गेली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्रासह कुलरचा कमी वापर, कृषीपंपाचाही कमी वापराने ही मागणी १६ हजार मेगावॅटपर्यंत घसरली आहे.

१७ जून रोजी राज्यात विजेची मागणी १६ हजार ५३० मेगावॅट होती. त्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने उसंत दिली. त्यामुळे तापमानात वाढ झाल्याने घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांकडे कुलर, पंखे, वातानुकूलित यंत्रासह इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा वापर वाढला. तर शेतीला पाणी देण्यासाठी कृषीपंपांच्याही वापरात वाढ झाली. त्यामुळे विजेची मागणी वाढून ५ जुलैला २० हजार ६०० मेगावॅटपर्यंत गेली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुंबई, पुणे, विदर्भासह इतरही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे तापमानात घट झाल्याने इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर कमी झाला. सोबत सर्वत्र कृषीपंपांचाही वापर कमी झाल्याने ही विजेची मागणी २२ जुलैच्या दुपारी २.५० वाजता १६ हजार मेगावॅटपर्यंत घसरली आहे.

महानिर्मितीच्या स्टेट लोड डिस्पॅच सेंटरच्या संकेतस्थळानुसार २२ जुलैच्या दुपारी ३ वाजता राज्यात विजेची मागणी १५ हजार ९४४ मेगावॅट होती. त्यातील ११ हजार ३६४ मेगावॅट विजेची निर्मिती राज्यात होत होते. तर केंद्राच्या वाट्यातील राज्याला ४ हजार ५८० मेगावॅट उपलब्ध होत होते.

राज्यात होणाऱ्या वीजनिर्मित महानिर्मितीच्या नाशिक औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून १२४ मेगावॅट, कोराडीतून १,०३६ मेगावॅट, खापरखेडातून २७०, पारसमधून १३५, चंद्रपुरातून १,२५१, भुसावळमधून २६६ मेगावॅट निर्मितीचा समावेश होता. तर अदानीकडून १,८०८, जिंदलकडून ७२७, रतन इंडियाकडून ६१२ मेगावॅट उत्पादन घेतले जात होते. या वृत्ताला महानिर्मितीच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

महानिर्मितीच्या प्रकल्पाची स्थिती

महानिर्मितीच्या राज्यभरातील औष्णिक विद्युत केंद्रातून ५ जुलैला ४ हजार ९०० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. २२ जुलैला मागणी कमी झाल्याने ही निर्मिती ३ हजार १०० मेगावॅटपर्यंत खाली आणावी लागली आहे.