11 August 2020

News Flash

पावसामुळे दाणादाण, सर्वत्र पाणीच पाणी!

रस्त्यांना नद्यांचे तर मोकळ्या जागांना तलावाचे स्वरूप

सायंकाळपर्यंत १११.६ मि.मी.ची नोंद; रस्त्यांना नद्यांचे तर मोकळ्या जागांना तलावाचे स्वरूप; ३० घरांमध्ये पाणी, पाच ठिकाणी झाडे पडली; महापालिकेचे पावसाळापूर्व नियोजन फोल

मंगळवार सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचे तर मोकळ्या भूखंडावर साचलेल्या पाण्यामुळे तेथे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. ठिकठिकाणी वाहनकोंडी, वस्त्या, घरे आणि मंदिरातही पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. महापालिकेचे पावसाळापूर्व नियोजन किती तकलादू होते, याचा प्रत्यय या पावसाने दिला. सायंकाळ ५.३०  पर्यंत १११.६ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे नागपूर वेधशाळेकडून सांगण्यात आले व पुढील ४८  तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. महापालिकेने पावसाळा पूर्व नियोजनाचा मोठय़ा प्रमाणात गाजावाजा केला. बैठका, महापौर व इतर पदाधिकाऱ्यांनी दौरे केले, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, मात्र मलबजावणीच्या पातळीवर त्यात किती फोलपणा होता हे आजच्या पावसाने नागरिकांना झालेल्या त्रासावरून स्पष्ट झाले.

सकाळी ९ पासून सुरू झालेला पाऊस दुपारी १ वाजेपर्यंत सुरू होता. यापैकी दोन तास दमदार पावसाचे होते. या पावसाने शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी,  रस्ते जलमय, बाजारपेठा आणि अपार्टमेन्टच्या तळघरात पाणी, वर्धामार्गावरील उड्डाणपुलावर पाणी  जिकडे तिकडे चोहीकडे पाणीच पाणी असे सार्वत्रिक चित्र होते. घरात शिरलेल्या पाण्यामुळे महिलांची, शाळा सुटल्यावर वाहनात अडकलेल्या मुलांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील नाग,पिवळी आणि पोरानदी दुथडी भरून वाहत होत्या. इतर छोटय़ा-मोठय़ा नाल्यांनाही पूर आल्याने काठावरील झोपडपट्टय़ा  आणि वस्त्या जलमय झाल्या. शहरातील नेहमीच्या खोलगट भागाची अवस्था मागील पावसाळ्यासारखीच होती. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली व त्यानंतर जनजीवन सुरळित झाले.

अग्निशामक विभागाची कसरत

एकाचवेळी अनेक भागातून पाणी शिरल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येऊ लागल्याने यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागली. सर्वच ठिकाणी पोहोचणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले. त्यामुळे शक्य त्या ठिकाणी जाऊन पाण्याचा निचरा केला जात होता. नागरिकांसोबतच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडूनही येणाऱ्या दूरध्वनीमुळे कर्मचारी वैतागले होते. साधनांची कमतरता आणि अपुरे कर्मचारी यामुळे विभागाला अडचणी येत होत्या.

निवासी संकुलांची तळघरे पाण्यात

शहरातील अनेक निवासी संकुलाच्या (अपार्टमेंट) तळघरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.  नंदनवन, जरीपटका, इंदोरा, गोकुळपेठ, बर्डी, म्हाडा कॉलनी, सक्करदरा, वर्धमाननगर, नरेंद्रनगर, स्वावलंबीनगर, धरमपेठ, उज्ज्वलनगर, कुर्वेनगर आदी भागातून यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या. हुडकेश्वर आणि बालाजीनगरातील मधील एका राधा अपार्टमेंटमधील अनेक वाहने पाण्यात होती.

या वस्त्यांमध्ये पाणी

मंगळवारी सकाळपासून संततधार सुरू झाली. त्यानंतर त्याची तीव्रता वाढतच गेली. शहरातील वाठोडा, नरसाळा, हुडकेश्वर, मानेवाडा, बेसा, हिवरीनगर, ओंकारनगर, छत्रपतीनगर, जगनाडे चौक, वनदेवीनगर, हसनबाग, नरेंद्र नगर, रामेश्वरी, बालाजीनगर, जागनाथ बुधवारी या वस्त्यांसह कळमना परिसरातील तसेच खरबी मार्ग, नंदनवन, मानेवाडा, इतवारी आणि बेसा भागातील व्यापार संकुल, तेथील तळघरात तसेच नागपूरच्या धाडीवाल लेआऊट परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. वर्मा लेआऊट, रामनगर, रविनगर, गोकुळपेठ, कॉटन मार्केट, लोखंडी पुलाखालील भाग, मानस चौक, इंदोरा, नारा, पाचपावली, दक्षिणामूर्ती, अंबाझरी, पारडी, कळमना, वर्धमाननगर, टेलिफोन एक्सचेंज चौक, नरेंद्रनगर ते दिघोरी या भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. पाांढराबोडी, बेसा, नारा, म्हाडा कॉलनी, नंदनवन या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील लोक रस्त्यावर आले होते.

झोपडपट्टय़ांमध्ये पाणी

शहरातील नंदनवन, जयताळा, पांढराबोडी, मानेवाडा, हुडकेश्वर, नरसाळा, इंदोरा आणि वाठोडा यासह शहरातील विविध भागात असलेल्या झोपडपट्टीत पाणी शिरले होते. उत्तर नागपुरातील नारी भागात तर दक्षिण नागपुरातील बेसा परिसरातील अनेक झोपडय़ांमध्ये पाणी शिरल्याने लोक रस्त्यावर आले होते. नागनदीला लागून असलेल्या राहतेकर वाडी आणि इंदिरानगर झोपडपट्टीमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन घराबाहेर पडण्यास सांगितले होते. पण त्यांनी घर सोडले नव्हते.

आपात्कालीन विभागाला सतर्कतेचे आदेश

अनेक ठिकाणी नाल्या बंद असल्याने, सिमेंट रस्त्याच्या कामांमुळे, मेट्रोच्या बांधकामाने निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ते रस्त्यावर आले. काही भागात हे पाणी वस्त्यांमध्ये शिरले. मात्र महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागात पाण्याचा उपसा करण्यााच्या दृष्टीने प्रयत्न केले आहे. यापुढे मुसळधार पावसाची शक्यता बघता अग्निशमन विभाग आणि आपातकालीन विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.   नंदा जिचकार, महापौर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2017 1:02 am

Web Title: heavy rain in nagpur 2
Next Stories
1 शाळेचा पहिला दिवस पावसात
2 बेसा मार्गावरील नवीन पूल वाहून गेला
3 आईवडिलांच्या कुशीत अनघा, जान्हवीचा शेवटचा प्रवास
Just Now!
X