जोरदार पावसाने ग्रामीण भागात दैना

नागपूर : हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा उपराजधानीत प्रत्यक्षात उतरला नसला तरीही शहराच्या आसपासच्या गावांमध्ये त्याचा चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यतील खापाजवळील उमरी जमारपानी परिसरात उमरी नाल्यावरील पुलाचा बराचसा भाग वाहून गेला, तर खापा ते मनसर दरम्यान रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने दिलेला पर्यायी मार्गाचा बराचसा भाग वाहून गेला.

नागपूरसह संपूर्ण विदर्भात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामानाने शहरात फारसा पाऊस झाला नाही, पण जिल्ह्यतील अनेक गावांमध्ये पाऊस धो-धो बरसला. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उमरीनाला पुलाचा बराचसा भाग वाहून गेला. अजूनही या पुलावरून पाणी वाहत आहे. हा जुना पूल कमी उंचीचा असून पावसाळ्यात अनेकदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन व अधिक उंचीच्या पुलाची मागणी गावकऱ्यांनी केली होती.

काल रात्रीच्या पावसात हा पूल पाण्याखाली वाहून गेला आणि पुलाचा एक भागही वाहून गेला. दुसऱ्या घटनेत उमरी नाल्याजवळ खरी पंजाब गावाजवळ घडली. खापा ते मनसर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी याठिकाणी मातीचा पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात या पर्यायी मार्गाचा बराचसा भाग वाहून गेला. यात एक ट्रक खाली अडकला असून चिखलात फसला होता.