24 January 2020

News Flash

दमदार पावसाचा मुक्काम

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

शहरात मंगळवार मध्यरात्रीपासून संततधार सुरू असून अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. हा पाऊस बुधवारीही रात्रभर कायम राहिल्यास नदीकाठच्या वस्त्यांना धोका असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागातही मुसळधार पावसाने ठाण मांडले असून दुष्काळग्रस्त नरखेड तालुक्यातील अनेक छोटय़ा नदी-नाल्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जलालखेडा-वरुड मार्गावर भरसिंगीजवळ जाम नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान विभाग तसेच तज्ज्ञांनी सात ते नऊ ऑगस्टदरम्यान विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला होता. बुधवारी दिवसभर शहरात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. यामुळे अनेक खोलगट भागात पाणी साचले आहे. या पाण्यामुळे दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात सिमेंटचे रस्ते असणाऱ्या चौकांमध्ये प्रामुख्याने शंकरनगर, बजाजनगर, जगनाडे चौकात पाणी साचले आहे. या पावसाने काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलेले डांबरीकरण उघडले असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. अंबाझरीतील विवेकानंद स्मारक ते उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे महिनाभरापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले. मात्र, या पावसाने डांबरीकरण निघून जागोजागी खड्डे पडले आहेत. शहरातील इतर रस्त्यांचीही हीच अवस्था आहे.

३५ बसफेऱ्या रद्द; प्रवाशांना मन:स्ताप

गेल्या काही दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे एसटीच्या उमरेड आणि हिंगणघाट परिसरातील काही भागात नदी-नाल्यांची पाण्याची पातळी वाढल्याने गुरुवारी एसटी बसच्या सुमारे ३५ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप झाला.  काही ठिकाणी पूर नसतानाही नाल्यांची पातळी वाढल्यामुळे सुरक्षेसाठी  हा निर्णय घेतल्याचे एसटीच्या काही अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले. नागपूर मार्गावर विविध बसस्थानकांवरील अनेक प्रवासी आल्या पावली परतले. दरम्यान काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळ मुख्यालयाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र लिहून अतिवृष्टी व प्रवासी भारमान कमी झाल्यावरही बसफेऱ्या कमी न केल्याने महामंडळाला रोज लक्षावधींचा फटका बसला आहे. यापुढे अनावश्यक फेऱ्या चालवणारे आगार व्यवस्थापक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. या भितीपोटी काही पूर नसलेल्या भागातील बसफेऱ्या बंद झाल्या काय? असा  प्रश्न उपस्थित होत आहे.  गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्य़ात एसटीच्या १,६०० किलोमीटर रोजच्या प्रवासाला कात्री लावण्यात आली आहे. याबाबत एसटीचे विभाग नियंत्रण अशोक वरठे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

झाड कोसळून एक जखमी

वर्दळीचा भाग असलेल्या मेडिकल चौकात संगम रेस्टॉरंटच्या समोर रात्री मोठे झाड पडले. यात एक जण जखमी झाला, तर पाच ते सहा वाहने दबली. झाड पडल्यानंतर या भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी आली. मात्र झाड मोठे असल्याने क्रेन बोलावण्यात आली. झाड पडल्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, नरेंद्रनगर आणि सतरंजीपुरा या भागातही झाडे पडली असून ते उचलण्याचे काम रात्री सुरू होते.

शाळा, समाजभवन रात्रभर उपलब्ध

नाईक तलाव, नागनदी, पोहरा नदीच्या काठय़ावर अनेक वस्त्या आहेत. रात्रभर पाऊस राहिल्यास तलाव आणि नद्यांमधील पाण्याची पातळी वाढून काठावरील वस्त्यांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने संबंधित झोनमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रत्येक झोनमधील शाळा तसेच समाजभवन रात्रभर सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. रात्री पूरस्थिती उद्भवल्यास या वस्त्यातील नागरिकांना त्याठिकाणी हलवण्यात येईल.

शेताला तलावाचे स्वरूप

नरखेड तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जाम नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक खोळंबली आहे. वरुड मार्गाचे सिमेंटीकरण केल्यामुळे रस्त्याची उंची वाढली. रस्त्यांची उंची अधिक आणि शेतजमिनी तुलनेने खाली असल्याने पावसाचे पाणी शेतात साचले आहे. त्यामुळे पिके पाण्याखाली जाऊन शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. काटोल तालुक्यातही दमदार पाऊस झाला.

First Published on August 9, 2019 11:12 am

Web Title: heavy rainfall in maharashtra mpg 94 5
Next Stories
1 मेट्रोस्थानकावर वाहनांसाठी ‘बॅटरी चार्जिंग’ सुविधा
2 आईचा खून करणाऱ्याची फाशी रद्द
3 हुंडय़ासाठी छळामुळे महिलेची आत्महत्या
Just Now!
X