11 December 2019

News Flash

आंतरराज्यीय धरणांचा पूर्व विदर्भालाही फटका

२००५ मध्ये मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने संजय सरोवर पूर्ण भरले होते व त्यातून पाणी सोडण्यात आले.

मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाल्यास पूर्व विदर्भात पूर

चंद्रशेखर बोबडे, नागपूर

एका राज्यातील धरणातून पाणी सोडणे किंवा न सोडणे याचा परिणाम शेजारच्या राज्यातील शहरांवर होत असल्याचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील पुराच्या घटनेमुळे उघड झाले. अशीच स्थिती महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील काही जिल्ह्य़ाच्या संदर्भातही आहे.

मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून पाणी सोडले की पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या वैनंगगेला पूर येतो. मोठय़ा प्रमाणात पीक हानी होते. तसेच पेंच नदीवरील धरण बांधून पाणी अडवल्याने नागपूरचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पूर्व विदर्भाच्या सीमेला लागून मध्यप्रदेश राज्य आहे. वैनगंगा आणि पेंच या दोन नद्या मध्यप्रदेशातून पूर्व विदर्भाच्या दिशेने वाहतात.  मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्य़ात वैनगंगेवर संजय सरोरवर हा प्रकल्प आहे, तर छिंदवाडा जिल्ह्य़ात पेंच नदीवर धरण बांधण्यात आले आहे.

२००५ मध्ये मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने संजय सरोवर पूर्ण भरले होते व त्यातून पाणी सोडण्यात आले. यामुळे पूर्व विदर्भातून वाहणाऱ्या वैनगंगेला पूर आला. परिणामी, भंडारा जिल्ह्य़ातील ३०, गोंदिया जिल्ह्य़ातील ९४ गावांना फटका बसला होता व हजारो हेक्टर पिकांची हानी झाली होती. अनेकदा पूर्व विदर्भात पाऊस नसतो, पण नद्यांना मात्र पूर येतो यामागचे कारणही हेच आहे.

असाच प्रकार पेंच नदीच्या बाबतही आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्य़ातून या नदीचा उगम असून ती महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यातील सीमेवर असलेल्या पेंच राष्ट्रीय उद्यानातून वाहते. या नदीवर महाराष्ट्रात दोन तर मध्यप्रदेशात एक धरण बांधण्यात आले आहे. महाराष्ट्रात म्हणजे नागपूर जिल्ह्य़ात तोतलाडोह आणि नवेगाव खैरी येथे तर मध्यप्रदेशात छिंदवाडा जिल्ह्य़ात अलीकडेच मध्यप्रदेश सरकारने धरण बांधले आहे. नवेगावखैरी धरणातील ७० टक्के पाणी नागपूर शहरासाठी वापरले जाते. उर्वरित पाणी सिंचनासाठी राखून ठेवले जाते. आता मध्यप्रदेश सरकारने सुद्धा याच नदीवर धरण बांधले. त्यामुळे नागपूर जिल्ह्य़ातील दोन्ही धरणाच्या पाणीसाठय़ावर परिणाम झाला. त्यातच मागील वर्षी आणि यंदाही सुरुवातीला पाऊसच न आल्याने हे धरण कोरडे पडले. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊन एक दिवसा आड पाणी देण्याची वेळ महापालिकेवर आली. सिंचनासाठी होणारा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला.

पेंचवर म.प्र. सरकारने धरण बांधल्याने नागपूरला मिळणारे पाणी कमी झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पर्यायी योजना तयार केली असून त्याला शासनाने मंजुरी दिली आहे, त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

First Published on August 14, 2019 4:06 am

Web Title: heavy rains in madhya pradesh causes floods in east vidarbha zws 70
Just Now!
X