नोटाबंदीची झळ कायम

शनिवार आणि रविवारच्या सुट्टय़ानंतर सोमवारी बँका उघडल्याने पुन्हा बँकेत गर्दी उसळली. नेहमीप्रमाणे काही एटीएम बंदच होते, तर काहींसमोर रांगा लागल्या असल्याचे चित्र पुन्हा दिसून आले.जुन्या नोटा बदलवून नव्या नोटा मिळण्यासाठी शुक्रवार हा अंतिम दिवस होता. तब्बल दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी बँका सुरू झाल्या. मात्र अद्याप बँकांना मागणीच्या तुलनेत रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुरेसा पसा मिळत नसल्याने ग्राहकांना याचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. धनादेशाद्वारे हवी असलेली मर्यादित २४ हजाराची रक्कम देखील ग्राहकांना मिळत नसल्याने गेल्या तीन आठवडय़ांपासून नागरिकांच्या बँकेतील फेऱ्या कमी होण्याचे नाव घेत नाही.

८ नोव्हेंबरला सरकारने चलनातील पाचशे व एक हजाराच्या नोटा अचानक बंद केल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली. बँकांसमोर जुन्या नोटा भरण्यासाठी लांब रांगा दिसून आल्या, तर पसे काढण्यासाठी एटीएमसमोर लोकांनी एकच गर्दी केली. मात्र, शंभरच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याने निर्णयाच्या आठवडय़ाभरात सर्व व्यवहार ठप्प पडले. केवळ दोन हजाराची नवी नोट मिळत असल्याने सुटय़ा पशांमुळे नागरिकांना दोन हात करावे लागले. मात्र, गेल्या आठवडय़ात पाचशेच्या नव्या नोटा चलनात आल्या, त्यासाठी बँकेत नागरिकांनी मोठी गर्दी केली. परंतु त्या देखील प्रत्येकाला मिळाल्या नाहीत. मिळालेल्या नव्या नोटा घरीच जमा करण्यावर नागरिकांचा कल असल्याने अद्याप बाजारात फिरत्या नोटांची कमी आहे. सोमवारी बँकांमध्ये धनादेश अथवा व्रिडॉल स्लीपच्या माध्यमातून पसा काढण्यासाठी नागरिकांनी परत रांगा लावल्या. मात्र, रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकांना मागणीच्या तुलनेत हवी तेवढी रक्कम मिळत नाही. परिणामी, ग्राहकांनी धनादेशावर २४ हजाराची मागणी केल्यावर त्यांना केवळ पाच हजार देण्यात येत आहे. अशात अनेक बँकांमध्ये रोष व्यक्त करण्यात आला. एका आठवडय़ात बँकेतून दिवसाला धनादेशाद्वारे केवळ २४ हजार रुपये काढता येतील, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र नव्या नोटांचा तुडवडा असल्याने बँकांनाच मागणीच्या तुलनेत पसा मिळत नसल्याने ग्राहक आíथक कोंडीत सापडला आहे, तर अद्याप सर्वच बाजारात मंदीचे वातावरण कायम आहे.

एटीएममधून २ हजार रुपये काढण्यासाठी गर्दी होत असून अनेक बँकांचे एटीएमही बंद अवस्थेत आहेत. अनेकांजवळ आजही जुन्या नोटा असून त्या अन्य मार्गाने कशा चालवता येऊ शकतील याचाही प्रयत्न अनेकांकडून होताना दिसून येत आहे.

आज प्रत्येक नागरिक केवळ पसे काढण्यासाठी बँकेत येताना दिसून येत आहे. त्या तुलनेत बँकेत पसे भरणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. नव्या नोटा घेऊन कोणी पसे भरण्यास आले असे अद्याप तरी दिसून आले नाही. त्यामुळे बाजारात पसा फिरत नसल्यामुळे नोटांची टंचाई जाणवत आहे. बँकांना आरबीआयकडून मर्यादित पशांचा पुरवठा होत असल्याने प्रत्येक ग्राहकाला मर्यादित पसा वितरित करण्यात येत आहे. ग्राहकांची खात्यात पसा ठेवण्यावर नापसंती असल्याचे चित्र आहे.

– सुरेश बोभाटे, विदर्भ प्रमुख, बँक ऑफ इंडिया