हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. निकुंज पवार यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

हृदय आणि इतरही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या काही रुग्णांवर शासकीय योजनेच्या तुलनेत अधिक खर्च लागतो, तर काहींना तांत्रिक कारणाने योजनेचा लाभ मिळत नाही. या रुग्णांना उपचारात आर्थिक चणचण जाणवू नये म्हणून रुग्णालयांत फाऊंडेशन स्थापन करणे चांगली संकल्पना आहे. त्यातून गरजू रुग्णांना देणगीच्या निधीतून मदत करता येते, असे मत सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या हृदय शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. निकुंज पवार यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते. गंभीर संवर्गातील हृदय आणि इतर शल्यक्रियेदरम्यान काही रुग्णांवर इतरही गुंतागुंत संभवते. त्यातील काहींना शस्त्रक्रियेदरम्यान दोन व्हॉल्व टाकण्यासह इतर उपकरणांची गरज पडते. परिणामी, या रुग्णांवरील उपचाराचा खर्च वाढतो. दरम्यान, महात्मा फुलेंसह इतरही योजनेत या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाची सीमा निश्चित आहे. शासकीय व्यवस्थेत मदतीला मर्यादा असल्याने या रुग्णांच्या उपचारात अडचण येते. काही रुग्णांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने तात्पुरता तोडगा काढला जातो. परंतु योजनेसाठी अपात्र ठरणाऱ्यांसाठी काहीही करता येत नाही.

या सर्वाच्या उपचारात अडथळा येऊ नये म्हणून मुंबईतील टाटा ट्रस्ट रुग्णालयांत असलेल्या फाऊंडेशनकडून मदतीची सोय सर्व शासकीय रुग्णालयांत राबवणे फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी फाऊंडेशनची स्थापना करून त्याचे अधिकार तेथील संस्था प्रमुखांना असायला हवे. या फाऊंडेशनमध्ये विविध मल्टिनॅशनल कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीसह दानदात्यांकडून निधी गोळा करून आकस्मिक गरज असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी मदत होऊ शकते. त्यातून राज्यातील मोठय़ा संख्येने गरजू व गरीब हृदयरोगाच्या रुग्णांसह इतरही संवर्गातील गरजू रुग्णांना लाभ मिळू शकतो, असे मत डॉ. निकुंज पवार यांनी व्यक्त केले.

सुपरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाची भरारी

सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या हृदय शल्यक्रिया विभागात जून-२०१७ ते जून-२०१८ या काळात ५३८ रुग्णांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया झाल्या. उपचारादरम्यान १०९ मृत्यू झाले. कमकुवत हृदयरुग्ण जास्त असणे त्याला कारणीभूत आहे. जुलै-२०१८ ते जून-२०१९ मध्ये येथे डॉक्टरांची संख्या कमी झाली. त्यामुळे ३६३ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या. त्यातील २५ जणांचा मृत्यू झाला. परंतु मृत्यूची टक्केवारी २० टक्क्यांवरून घटून केवळ ७ टक्क्यांवर आणण्यात प्रशासनाला यश आले. त्यात अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यासह वैद्यकीय शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत महत्त्वाची असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. येथे लवकरच हृदय प्रत्यारोपण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

न्यूझीलंडमध्येही चांगली पद्धत

न्यूझीलंडमध्ये शासकीय आणि खासगी अशा दोन पद्धतीची रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालयांत कुणी आरोग्य विमा काढलेला रुग्ण आल्यास त्याला खासगीत विम्यातून उपचार शक्य असल्याने पाठवले जाते. त्यामुळे शासकीय रुग्णालयांत गरिबांवर उपचार होऊन प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होते. तेथे हृदय आजाराचा रुग्ण असल्यास व वेळीच त्याची प्रकृती खालवल्यास त्याला प्राधान्याने पहिले शस्त्रक्रियेसाठी घेतले जाते, तर वैद्यकीय तपासणीदरम्यान कमकुवत हृदय व तुलनेत चांगले हृदय अशी रुग्णांची वर्गवारी उपचारासाठी होत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

मानसिक ताण-तणावातून हृदयरुग्णांत वाढ

मानसिक ताण-तणावातून नागपूरसह सर्वत्र हृदय रुग्ण वाढत आहेत. कमी वयाच्या तरुणांमध्येही हृदयरोगाचे रुग्ण आढळतात. सुपरस्पेशालिटीत तरुण रुग्णांची संख्या वाढत आहे. कमी वयात हृदयरोगाला शरीरात प्रोटीनची कमतरताही एक कारण आहे.