निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून नोटीस जारी

निर्धारित खर्च मर्यादेत निवडणूक खर्च करणे अशक्य असल्याने उमेदवारांकडून केलेला खर्च कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र निरीक्षकांच्या पडताळणीत ही बाब उघड होत असल्याने जिल्ह्य़ातील  सर्वच मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळून आली आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

जिल्ह्यत १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. एकूण १४६ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या लेख्यांच्या तपासणीसाठी निरीक्षक अनुक्रमे  निरीक्षक गौतम पात्रा, प्रतीक कुमार, सुब्राज्योती चक्रवर्ती आणि शशिभूषण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वानी १२ ही मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या तपशीलाची तपासणी केली. यात त्यांना दर्शवलेला खर्च आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यात तफावत दिसून आल्याने त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्फत नोटीस बजावली आहे.

निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दर निर्धारित केले असून प्रत्येक उमेदवाराच्या प्रचार यात्रेचे व्हिडीओ शुटिंग निवडणूक शाखेकडून केले जाते. उमेदवाराने खर्चाचा तपशील सादर केल्यावर त्याची पडताळणी निवडणूक शाखेच्या माहितीसोबत केली जाते व त्यात तफावत आढळून आल्यास नोटीस बजावली जाते.

नावांबाबत मौन

निवडणूक शाखेकडून खर्च तपासणीबाबत पाठवण्यात आलेल्या माहितीत फक्त उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांची नावे वगळण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील १२ मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत हे येथे उल्लेखनीय.