वडिलांना महिन्यातून एक दिवस भेटण्याची मुभा; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

पती-पत्नीत भांडणे असतील तर मुलांचा ताबा कुणाकडे असावा, असा पेच निर्माण होतो. मात्र, पती-पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाल्यास साहजिकच मुलांचा ताबा हयात असलेल्या पालकास मिळतो. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका प्रकरणात पत्नीच्या मृत्यूनंतर दोन मुलांचा ताबा पतीला न देता आजोबाला देण्यात आला. उच्च न्यायालयाने मुलांच्या वडिलांना महिन्यातून केवळ एक दिवस मुलांना भेटण्याची संधी दिली.

रमाकांता लछमन्ना शेटपल्लीवार रा. मांडवा, जि. यवतमाळ हिचा विवाह १९९७ मध्ये डेहनी, ता. दिग्रस, जि. यवतमाळ येथील रहिवासी अनिल श्रीराम मारसेटवार यांच्याशी झाला. त्यांना अमृता आणि ऋषिकेश अशी दोन मुले आहेत. २०१० मध्ये रमाकांता यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यावेळी अमृता ही १३ वर्षे आणि ऋषिकेश हा १२ वर्षांचा होता. पत्नीच्या निधनानंतर अनिल हे मानसिक धक्क्यात होते. त्यावेळी दोन्ही मुले आजोबा (आईचे वडील) लछमन्ना इरान्ना शेटपल्लीवार यांच्याकडे रहात होती. काही वर्षांनी अनिल यांनी मुलांना परत आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सोबत राहण्यास नकार दिला. अनिल यांनी मुलांचा ताबा मिळावा म्हणून कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने दोन्ही मुलांचा ताबा त्यांच्याकडे दिला. मात्र, या निर्णयाला लछमन्ना यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेवर न्या. डॉ. शालीनी फणसाळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अनिल हे मुलांचे वडील असल्याने कायद्यानुसार मुलांवर त्यांचाच अधिकार आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ते आजोबाकडे रहात असल्याने तसेच त्यांना वडिलांकडे जायचे नाही. अशा परिस्थितीत न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर मुलांचा ताबा आजोबाला दिला.

पंधरा दिवसांत दुसरे लग्न करणाऱ्या वडिलांना विरोध

पत्नीच्या मृत्यूनंतर वडिलांनी पंधरा दिवसांतच दुसरा विवाह केला. आता त्यांना एक मुलगाही आहे. अशा परिस्थितीत वडिलांकडे राहण्यास नकार देत मुलांनी आजोबाकडे राहायचे आहे, असे न्यायमूर्तीना त्यांच्या कक्षात सांगितले. मुलगी आता १७ वर्षे आणि मुलगा १५ वर्षांचा असल्याने ते बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत. त्यांचा विचार महत्त्वाचा आहे. ते रहात असलेली परिस्थिती त्यांना भावलेली असून त्यांना वडिलांकडे नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल. याचा मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वडिलांनी केवळ महिन्यातील पहिल्या शनिवारी मुलांची भेट घ्यावी. मात्र, मुलांचा ताबा हा आजोबाकडेच राहणार, असा निर्वाळा दिला.