आपल्या बाजूने निकाल मिळवण्यासाठी न्यायालयाची दिशाभूल

नागपूर : न्यायालयांमध्ये वकिलांना उभे राहण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा गणवेश ठरवून दिलेला आहे. गणवेश परिधान करून आपल्या अशिलाची बाजू मांडणे हा न्यायालयीन शिष्टाचाराचा एक भाग असताना अंगावर गणवेश व बँड नसताना वकील न्यायालयाच्या सुनावणीसाठी हजर कसा राहू शकतो, अशा शब्दात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका वकिलाला चपराक लगावली.

अभियांत्रिकी प्रवेशासंदर्भातील एका याचिकेवर सोमवारी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्यासमक्ष ऑनलाईन सुनावणी झाली. वरिष्ठ अधिवक्त्यांनी याप्रकरणी बाजू मांडली. त्यांच्या शेजारी त्यांना सहकार्य करणारे कनिष्ठ वकील होते. कनिष्ठ वकिलांनी नियमानुसार वकिलाचा गणवेश परिधान करणे आवश्यक होते. पण, ते अतिशय साध्य वेशात असल्याचे न्यायमूर्तीच्या निदर्शनास आले व त्यांनी लगेच संबंधित वकिलांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. वकिलाचा गणवेश न्यायालयीन शिष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे वकिलांनी व्यवस्थित गणवेश घालून त्यावर बँड बांधणे आवश्यक आहे. पण, गणवेश व बँड परिधान न करता एखादा वकील न्यायालयासमोर उभा कसा राहू शकतो, असा न्यायालयाने सवाल करून संबंधित याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. दुसरीकडे वरिष्ठ वकिलांनी कनिष्ठ वकिलांच्या मदतीने माफी मागितली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरण ऐकले असता हे प्रकरण यापूर्वीच मार्च महिन्यात न्यायालयाने ऐकले व फेटाळले होते. अशावेळी संबंधित याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणे किंवा याच न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे अपेक्षित होते. पण, वकिलांनी न्यायालयाची दिशाभूल करून अवकाशकाळात संबंधित प्रकरणी पुन्हा रिट याचिका दाखल करून नवीन न्यायमूर्तीकडून आपल्या बाजूने निकाल मिळवून घेतला. न्यायालयीन सुटय़ा संपताच पुन्हा प्रकरण नियमित खंडपीठासमोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस येत असून हा ‘बेंच हंटींग’चा प्रकार असून वकिलांचे असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असेही न्यायालयाने बजावले. तसेच वकिलाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.