* डॉ. संजय जयस्वाल यांचे आवाहन
* आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचा वर्धापन दिन
सामान्य नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. आरोग्य विभागातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्याची गरज आहे. त्याचबरोबर या नागरिकांना शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी केले. नागपुरच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र या संस्थेच्या ५६ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. हरीश कळमकर, राज्य आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था नागपुरचे प्राध्यापक डॉ. फुलचंद मेश्राम, डॉ. मिलिंद गणवीर, डॉ. माध्यमा चहांदे, डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. पारवेकर उपस्थित होते. डॉ. जयस्वाल म्हणाले की, शासनाकडून नागरिकांना चांगल्या प्रतिच्या आरोग्य सेवा मिळाव्या म्हणून अनेक योजना सुरू केल्या जातात. परंतु त्याची माहिती तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहचत नाही. तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरीता सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ. हरीश कळमकर म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाकरीता या संस्थेची स्थापना झाली आहे.
संस्थेत डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण दिले जात असल्याने रुग्णांना चांगल्या सेवा मिळण्यास मदत होते. या प्रशिक्षण संस्थेत येणाऱ्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून येथे व्यायाम शाळा देखील विकसित करण्यात आली आहे. डॉ. मिलिंद गणवीर म्हणाले की, बहुउद्देशिय आरोग्य सेवक हे लोकांना २४ तास सेवा देत असल्यामुळे ते आरोग्य सेवेचा कणा आहे. नागरिकांना आणखी चांगली सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितांना डॉ. चहांदे, डॉ. पारवेकर, डॉ. कन्नमवार यांच्यासह इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबीरात २४ प्रशिक्षणार्थीनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. उमेश चुटे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ज्योती कन्नाके यांनी केले.

निबंध स्पर्धेत भोयर, आकृती स्पर्धेत गोरे प्रथम
कार्यक्रमात प्रशिक्षणार्थीची निबंध व आकृती स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत सचिन भोयर याने प्रथम तर मोरेश्वर गजबे याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर आकृती स्पर्धेत सचिन गोरे यांनी प्रथम तर अमोल सोनोने यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या चौघांनाही कार्यक्रमात पुरस्कार देवून गौरवण्यात आले.