रुग्णांना वेळीच उपचार मिळणार कसे?

नागपुरात प्रत्येक वर्षी सर्वाधिक मुखाच्या कर्करुग्णांची नोंद केली जाते, परंतु या रुग्णांवर उपचाराचा एक भाग असलेल्या ‘लाईट’ देण्याकरिता बोटावर मोजण्याइतकेच विकिरणोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहे. तेव्हा रुग्णांना ‘लाईट’ घेण्याकरिता मोठय़ा प्रमाणावर प्रतीक्षा करावी लागत असल्याने पैकी काही रुग्णांचा लाईट घेण्यापूर्वीच मृत्यूही होतो. तेव्हा शहरातील कर्करुग्णांचे हाल थांबणार कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

देशातील वेगवेगळ्या भागाच्या तुलनेत नागपूरला सर्वाधिक मुखाच्या कर्करुग्णांची नोंद प्रत्येक वर्षी केली जाते. हे रुग्ण वाढण्याला शहरात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढण्यासह सर्रास प्रतिबंधात्मक गुटखा, पानमसाला, विविध तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधित सुपारीची विक्री हेही एक प्रमुख कारण आहे. या वस्तू नागरिकांना सहज शहराच्या कोणत्याही भागात उपलब्ध होत असल्यानेच या वस्तूंचे सेवन वाढून हे रुग्ण वाढत असल्याचे बऱ्याच सामाजिक संस्थांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. सोबत इतरही कारणाने शहरात वेगवेगळ्या प्रकारचेही कर्करुग्ण वाढत आहे. रुग्ण वाढत असतानाच शहरात त्यांच्यावर उपचाराच्या सोयी सुविधा मात्र फार तोकडय़ा असल्याचे निदर्शनात येत आहे.

नागपूर शहरात प्रत्येक वर्षी ७ हजाराहून जास्त नवीन कर्करुग्णांची नोंद केली जाते. पैकी अनेक रुग्णांना उपचाराचा एक भाग म्हणून ‘लाईट’ देण्याची गरज असते. त्याकरिता शहरातील २५ लाखांच्या जवळपास लोकसंख्या व नोकरी, कामासह इतर कामाकरिता शहरात असलेल्या इतर १५ लाखाहून जास्त नागरिकांची संख्या बघता मोठय़ा प्रमाणावर विकिरणोपचार तज्ज्ञ असण्याची गरज आहे, परंतु शहरात सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे ४ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय व संशोधन संस्था येथे सुमारे २ विकिरणोपचार तज्ज्ञच उपलब्ध असल्याची माहिती आहे. खासगी रुग्णालयात काही तज्ज्ञ असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची नोंद मात्र सरकारी दफ्तरी नाही.

शहरात प्रत्येक वर्षी सात हजारांहून जास्त नवीन कर्करुग्णांची नोंद होत असताना ही संख्या फारच तोकडी आहे. विकिरणोपचार तज्ज्ञांचा वानवा असल्याने निश्चितच प्रत्येक केंद्रात फार कमी रुग्णांवर नित्याने ‘रेडिएशन’ दिल्या जातात. तेव्हा अनेक रुग्णांना ‘रेडिएशन’करिता प्रतीक्षा यादीत ठेवावे लागते. पैकी शेवटच्या टप्प्यात कर्करोग आढळलेल्या रुग्णांना बरेचदा ‘रेडिएशन’ मिळण्यात अडचण येत असल्याने प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. त्यातच काही रुग्णांचा ‘रेडिएशन’ मिळण्यापूर्वीच मृत्यूही होत असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. तेव्हा विकिरणोपचार तज्ज्ञांची संख्या वाढवण्याकरिता शहरासह राज्यात या विषयाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम वाढवण्याची गरज पुढे येत आहे.

३,३०० रुग्णांची नोंद

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय व संशोधन संस्थेत सन २०१४ साली एकूण ४ हजार ७०९ रुग्ण उपचाराकरिता आले. त्यातील ३,३०० रुग्ण धोकादायक तर १४०९ रुग्ण धोक्याबाहेरील अवस्थेतील होते. त्यामध्ये सर्वाधिक ८४८ (२५.७० टक्के) रुग्ण मुखाच्या कर्करोगाचे, ४८७ (१४.७६ टक्के) महिला रुग्ण गर्भाशयाच्या कर्करोगाचे, ४३० महिला (१३.०३ टक्के) स्तनाच्या कर्करोगाचे, १०८ (३.२७ टक्के) फुफ्फुसाच्या कर्करोगाचे, १४२७ (४३.२४ टक्के) इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाचे आढळले.

पदव्युत्तर’च्या जागा वाढवा -डॉ. कांबळे

महाराष्ट्रात केवळ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे विकिरणोपचार विषयाचे दोन पदव्युत्तर जागा उपलब्ध आहे, परंतु भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय)च्या त्रुटी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून दूर न झाल्याने या जागांच्या मान्यता रद्द केल्या गेल्या आहे. कर्करुग्णांना जास्त विकिरणोपचार तज्ज्ञ उपलब्ध करून देण्याकरिता मेडिकलसह मेयो व इतरही सगळ्याच शासकीय संस्थांत पदव्युत्तरचे अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे, असे मत शहरातील ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. क्रिष्णा कांबळे यांनी व्यक्त केले.