टपाल विभागात ३५३६ कोटी ५९ लाखांची, तर बँकांमध्ये केवळ २८३ कोटींची गुंतवणूक

‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘सुकन्या समृद्धी’ योजनेला बॅंकांपेक्षा टपाल विभागांतर्गत चांगली मागणी असून योजना सुरू झाल्यापासून बॅंकांच्या तुलनेत टपाल विभागात कितीतरी पटीने अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. देशभरात टपाल विभागांतर्गत ३ हजार ५३६ कोटी ५९ लाखांची, तर राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये केवळ २८३ कोटी १७ लाखांचीच गुंतवणूक झाली आहे.

मुलीचे संगोपन, शिक्षण आणि हुंडय़ामुळे विवाहावर प्रचंड खर्च होतो. त्यामुळे देशातील अनेक भागात जन्म होण्यापूर्वीच मुलीला मारण्यात येते. देशात महिला आणि पुरुषांच्या गुणोत्तरांमध्ये मोठी तफावत निर्माण होत असून भ्रूणहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘सुकन्या समृद्धी’ योजना सुरू केली. आईवडिलांनी मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावाने टपाल विभाग किंवा बॅंकांमध्ये गुंतवणूक केल्यास, तिच्या विवाहापर्यंत चांगली रक्कम आईवडिलांना प्राप्त होईल, असा या योजनेमागचा हेतू आहे. ३ डिसेंबर २०१४ पासून ही योजना सुरू झाली. मुलींच्या जन्मानंतर टपाल विभाग किंवा बॅंकेत मुलीच्या नावाने खाते उघडता येते. या बचत खात्यात किमान १ हजार ते दीड लाखांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करण्याची तरतूद आहे. मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत आईवडील खाते संचालित करू शकतात. त्यानंतर मुलगी स्वत: आपले बचत खाते संचालित करेल.

मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर खात्यातील ५० टक्के रक्कम काढता येते. मुलीच्या वयाच्या २१ वर्षांपर्यंत खाते सुरू ठेवता येते. या खात्यातील ठेवींवर वर्षांला ९.१० टक्के करमुक्त व्याज मिळणार आहे. एप्रिल २०१५ पासून या व्याजदरात वाढ करून ते ९.२० टक्के करण्यात आले. या खात्यातील गुंतवणूक आणि मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे.

टपाल विभाग आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये ‘सुकन्या समृद्धी’ योजनेचे खाते उघडता येते. कोणत्याही पीपीएफ खात्यापेक्षा सुकन्या समृद्धी योजना चांगली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे, परंतु नोव्हेंबर २०१५ देशात या योजनेंतर्गत ३ हजार ८१९ कोटी ७६ लाखांची गुंतवणूक झाली आहे.

त्यापैकी टपाल विभागांतर्गत ३ हजार ५३६ कोटी ५९ लाखांची सर्वाधिक, तर राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये केवळ २८३ कोटी १७ लाखांचीच गुंतवणूक झाली असल्याचे राष्ट्रीय बचत संस्थेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

सुकन्या समृद्धी योजनेचे खरे काम फेब्रुवारी २०१५ पासून सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत देशभरात लाखो खाती उघडण्यात आली आहेत. टपाल विभागातर्गत चांगला प्रतिसाद मिळत असून बॅंकांमध्येही अधिक गुंतवणूक व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– जमील असगर, प्रादेशिक संचालक, राष्ट्रीय बचत संस्था.