पुण्यातील ‘परिसर’ संस्थेचे उपराजधानीत सर्वेक्षण

नागपूर : उपराजधानी विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असतानाच येथील वाहनांची गतीसुद्धा तेवढीच वाढली आहे. मध्यवर्ती कारागृहासमोर वाहनांची गतीमर्यादा ओलांडण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ८७ टक्के आहे, तर महाराजबाग रस्त्यावर हे प्रमाण ३० टक्के आहे. पुण्यातील ‘परिसर’ या संस्थेने रस्ता सुरक्षा नेटवर्क सदस्यांसह नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या चार शहरांमध्ये वाहनांच्या वेगाबाबत सर्वेक्षण केले. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

या चार शहरांमधील ३४ रस्त्यांवर ३५ हजार वाहनांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. यातील २६ रस्त्यांवर ६० टक्के पेक्षा अधिक वाहनांनी गतीची  मर्यादा ओलांडलेली दिसली. त्यातील पाच रस्त्यांवर ९० टक्के वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन के ल्याचे आढळले. ज्या शहरात सर्वेक्षण करण्यात आले, त्या शहरांशी संबंधित पोलीस आयुक्तांना सर्वेक्षणाच्या प्रती पाठवण्यात आल्या. शहरी भागातील गतीमर्यादा कमी करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. उपराजधानीत  उच्च न्यायालय मार्ग,  मध्यवर्ती कारागृह मार्ग, नागपूर-अमरावती मार्ग, महाराजबाग मार्ग,  नागपूर-हिंगणा मार्ग तसेच नागपूर-हिंगणा टी पॉईंट मार्ग अशा सात मार्गावर हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मध्यवर्ती कारागृहासमोर वाहनांची गतीमर्यादा ओलांडण्याचे प्रमाण अधिक म्हणजेच ८७ टक्के आहे.  महाराजबाग रस्त्यावर हे प्रमाण के वळ ३० टक्के आहे. इतर सर्व रस्ते ५० टक्के ते ७१ टक्केच्या श्रेणीत आहेत. आठपैकी सहा रस्त्यांवर सकाळच्यावेळी वाहनांची अत्युच्च गती असल्याचे आढळले. तसेच दुपारी दोन वाजता देखील हा वेग अधिक असल्याचे आढळले. आठपैकी सहा रस्त्यांवर चारचाकी वाहनांचा वेग अधिक आढळून आला. महाराजबाग रोडवर दुचाकी वाहनांचा वेग अधिक होता. राजभवन रोडवर अवजड वाहनांचा वेग अधिक होता.

उच्च न्यायालय मार्ग

या मार्गावर अधिकाधिक वाहने ३६ ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. त्यानंतर ४१ ते ४५ प्रतिकिलोमीटर वेगाने वाहने धावतात. सर्वाधिक वाहने ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. ६७ टक्के वाहने वेगमर्यादा ओलांडतात. इतर वाहनांच्या तुलनेत चारचाकी वाहने वेगमर्यादा ओलांडतात. सकाळच्या वेळी वाहनमर्यादा ओलांडण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

मध्यवर्ती कारागृह मार्ग

या मार्गावर अधिकाधिक वाहने ३६ ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. सर्वाधिक वाहने ४१ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. १०० टक्के वाहने  वेगमर्यादा ओलांडतात. ३० किलोमीटर प्रतिताससुद्धा आणि त्यापेक्षाही अधिक वेगाने वाहने जातात.

नागपूर-अमरावती रोड

या मार्गावर अधिकाधिक वाहने ३६ ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. ५२ टक्के वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करतात. ६६ टक्के चारचाकी वाहने आणि जड वाहने वेगमर्यादा ओलांडतात. सकाळच्या वेळेस हे प्रमाण अधिक असते. ६२ टक्के  वाहने ३५ किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक वेगाने धावतात.

नागपूर-हिंगणा टी पॉईंट मार्ग

या मार्गावर अधिकाधिक वाहने ३६ ते ४० किलेामीटर प्रतितास वेगाने धावतात. त्यानंतर ४१ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. ७१ टक्के वाहने वेगमर्यादा ओलांडतात.

नागपूर-हिंगणा मार्ग

या मार्गावर अधिकाधिक वाहने ३६ ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. त्यानंतर ४१ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. सर्वाधिक वाहने ४३ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. ६७ टक्के वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करतात.

नागपूर राजभवन मार्ग

या मार्गावर अधिकाधिक वाहने ३१ ते ३५ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. त्यानंतर २६ ते ३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. ६४ टक्के वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करतात.

महाराजबाग मार्ग

या मार्गावर अधिकाधिक वाहने २६ ते ३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. सर्वाधिक वाहने ३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. ३० टक्के वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करतात.

नागपूर मार्ग

या मार्गावर अधिकाधिक वाहने ३१ ते ३५ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात.  त्यानंतर ३६ ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. सर्वाधिक वाहने ३१ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. ५० टक्के वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करतात. दुचाकी आणि चारचाकी वाहने ही तीन चाकी ते जड वाहनाच्या तुलनेत वेगमर्यादेचे उल्लंघन करतात.