एका तपासी अंमलदाराकडे ९.०७ प्रकरणे;  इतर शहरांच्या तुलनेत अधिक

राज्यातील इतर पोलिसांच्या तुलनेत नागपूर पोलिसांकडे काम अधिक असून शहरातील एका तपासी अंमलदाराकडे वर्षांचे ९.०७ प्रकरणे आहेत. इतर शहर व आयुक्तालयांच्या तुलनेत हे प्रमाण खूप अधिक असून शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहराच्या विकासासोबत येथील लोकसंख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित असलेले लोक शहराच्या बाहेरील भागात भाडय़ाने किंवा विविध झोपडय़ांमध्ये राहात आहेत. त्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर येत असून विद्यमान सरकार नवनवीन पोलीस ठाणे निर्माण करीत आहे. मात्र, नागपूर पोलीस दलात मंजूर मनुष्यबळ हे ७ हजार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन पदांची निर्मिती करून रिक्त पदे पदे भरण्यात यावीत, अशी मागणी राज्यस्तरावर होत आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा वार्षिक गुन्हे अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार शहरातील गंभीर गुन्ह्य़ांच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, महिलांवरील अत्याचार व घरफोडी, चोरी या गुन्ह्य़ांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. या अहवालातून राज्यातील पोलिसांवरील कामाच्या ओझ्याचाही अभ्यास करण्यात आला असून सर्वाधिक काम नागपूर पोलिसांकडे आहे. एका तपासी अंमलदाराकडे वर्षांला ९.०७ प्रकरणे आहेत. तर इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी आहे. आयुक्तालयांचा विचार केला तर मुंबईतील एका तपासी अंमलदाराकडे २.४९, पुणे ३.१६, ठाणे २.६४, नवीन मुंबई २ आणि नाशिकच्या तपासी अंमलदाराकडे ३ वार्षिक तीन प्रकरणांचा तपास येतो. त्या तुलनेत नागपुरातील तपासी अंमलदाराकडे असलेले हे प्रमाण खूप अधिक असून नवीन पदनिर्मितीशिवाय ते कमी होण्याची शक्यता नाही.

ताण कमी करण्याचे प्रयत्न

नागपुरातील तपासी अंमलदारांवर इतर शहरांच्या तुलनेत कामाचे ओझे अधिक आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. त्याकरिता तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे व कर्मचाऱ्यांवर एन-कॉप्समधून प्रशिक्षण देण्यासारखे उपाय योजण्यात येत आहेत. काम अधिक असूनही नागपूर पोलीस तपासात व गुन्हे नियंत्रणात चांगले काम करीत आहेत. गुन्हे प्रकटीकरणामध्ये गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरीही इतर शहरांच्या तुलनेत चांगली आहे.

– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.