अनेकांची दुसरी पिढीही शहरातच स्थायिक झाली

नागपूर : आधी विविध धार्मिक उत्सवात, मंदिरांमध्ये पूजापाठ व पौरोहित्य करणाऱ्यांमध्ये मराठी भाषिक असलेल्याची संख्या जास्त होती. मात्र गेल्या काही वर्षांत नागपूरसह विदर्भातील अनेक शहरात पूजा पाठ करणाऱ्या उत्तर भारतीय हिंदी भाषकांची संख्या वाढली आहे.

गेल्या काही वर्षांत  विशेषत: उत्तर भारतीय  युवक व ज्येष्ठ नागरिक या व्यवसायात उतरले असून नागपूरसह विदर्भातील अन्य शहरात ते स्थायिक झाले आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागात ते राहत आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व बिहार या राज्यातील  अनेक  तरुण  आहेत. अनेक मराठी भाषिक  तरुण-तरुणी स्वत:ची नोकरी, व्यवसाय सांभाळून केवळ  आवड म्हणूनही पौरोहित्य करतात. पौरोहित्य करण्यातून अर्थार्जनापेक्षा आनंद मिळतो  या भावनेतून ते हे काम करतात. परंतु उत्तर भारतातून येथे आलेल्या अनेक युवकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आधारित आहे.  विशेष म्हणजे,  मराठी भाषिकांकडेदेखील हिंदी भाषिक  पूजाऱ्याला बोलावले जाते. मध्यप्रदेशमधील रिवा  येथील बहुतांश युवक व ज्येष्ठ नागरिक नागपुरातील विविध मंदिरात पूजापाठ करतात. यातील अनेक जण येथेच स्थायिक झाले आहेत.

माझे वडील १५ वर्षांपासून नागपुरात पूजा पाठ करतात. चार वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशातील लखनऊ शहरातून नागपुरात आलो आणि वडिलांकडून पौराहित्याचे शिक्षण घेतले. मंदिरात आणि लोकांकडे जाऊन पूजा पाठ करणे हाच आमचा व्यवसाय आहे. मी आणि वडील नागपुरात असून कुटुंबातील  सदस्य गावाला आहेत. उत्तर भारतीय अनेक  युवक नोकरी मिळत नसल्यामुळे पूजा पाठ करत आहेत.

– भूपेश तिवारी, पुजारी.