• जन्मदात्री-सावत्र आईचा वाद निकालात
  • उच्च न्यायालयाने सामंजस्याने प्रश्न सोडविला

जाती-धर्माच्या नावावर आज लोक एकमेकांच्या जीवावर उठले असताना हिंदू आईच्या उदरातून जन्मलेल्या मुलाचा ताबा एका मुस्लीम महिलेला (मुलाची सावत्र आई) मिळाला असून जन्मदात्री मातेला आपल्या मुलाला केव्हाही भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. दोन्ही महिलांनी सामंजस्याची भूमिका स्वीकारून एका मुलावरील दावा निकाली काढला आणि समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.

आजपासून बारा वर्षांपूर्वीची ही घटना आहे. मुस्लीम मुलगा अरबाज याचे एका सुनीता नावाच्या (नाव बदलून) मुलीवर प्रेम जडले. त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर काही दिवसातच सुनीता ही पोलीस दलात नोकरीला लागली. त्यांना एक गोंडस मूल झाले. यानंतर त्यांचे आयुष्यच बदलले.

विवाहाच्या सहा वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. यातून २००९ मध्ये ते विभक्त झाले. त्यावेळी मुलगा हा पाच वर्षांचा होता. न्यायालयीन कचाटात मुलाचा ताबा त्याच्या वडिलांना मिळाला. घटस्फोटानंतर अरबाज याने सिमरन (नाव बदलून) या मुस्लीम महिलेशी लग्न केले. सिमरन त्या मुलावर पोटच्या गोळयाप्रमाणे जीव लावू लागली. दरम्यान, २०१० मध्ये अरबाजचा आकस्मिक मृत्यू झाला. अरमानपासून सिमरनला एकही मूल नाही किंवा तिने दुसरे लग्नही केले नाही. मुलाचे वडील मरण पावल्याची माहिती मिळताच नैसर्गिक आई सुनीता हिचे मुलावरील प्रेम जागे झाले. परंतु पतीच्या निधनानंतरही सिमरन ही मुलाचे संगोपन तेवढय़ाच काळजीने करू लागली. मुलगा परत मिळविण्यासाठी सुनीताने अनेक प्रयत्न केले. परंतु मुलगा हा जन्मदात्या आईकडे जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे सुनीताने कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. कौटुंबिक न्यायालयासमक्ष दोन्ही आईच्या प्रेमाची परीक्षा झाली. मुलाचे संगोपन करणाऱ्या आईसोबत राहायचे असतानाही नैसर्गिक नियमाने जन्मदात्याला आईला मुलाचा ताबा देण्यात यावा, असा निकाल २०१२ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने दिला.

या निकालाने सिमरनला जबर धक्का बसला. त्यामुळे तिने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात उच्च न्यायालयाने यापूर्वी ‘जैसे थे’ चे आदेश दिले होते. त्यामुळे मुलगा सिमरनकडेच होता. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना अनेकवेळा खंडपीठ बदलले. शेवटी न्यायालयाने प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठविले. मध्यस्थी केंद्रासमोर दोन्ही मातांची बाजू ऐकण्यात आली.

त्यावेळी दोघींनीही सामंजस्याची भूमिका स्वीकारली आणि मुलाचा ताबा सिमरनकडे ठेवण्यास सुनीता राजी झाली. तर सुनीता ही आपल्या मुलाला केव्हाही भेटू शकेल, अशी परवानगी सिमरनने दिली. दोघींनीही प्रकरण सामंजस्याने सोडवून समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.

सावत्र आईला अधिक पसंती

आज मुलगा बारा वर्षांचा असून त्याला स्वत:चे बरे-वाईट समजू शकते. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्याची दोनदा मुलाखत घेतली. त्यावेळी मुलाने सिमरनसोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मुलाचा आनंद लक्षात घेऊनच या प्रकरणात तोडगा काढण्यात आला.