‘छेडछाड प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी’
कामठी आणि रामटेक तालुक्यातील कांद्रीमध्ये दोन युवतीच्या संदर्भात घडलेल्या प्रकरणावरून गृहविभाग संवेदनशील नाही. अशा घटनांमध्ये पोलिसांनी अधिक संवेदनशील होण्याची गरज असून या घटनेचा तपास करताना जे दोषी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. यासाठी महिला आयोग पुढाकार घेणार असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्य़ात गुंडांच्या छेडखानीमुळे कामठीतील एका शाळकरी मुलीने आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत अतिप्रसंगाला विरोध करताना रामटेक तालुक्यातील कांद्री येथील १४ वर्षीय मुलीच्या हाताची दोन बोटे कापली गेली. या दोन्ही घटना निंदनीय आहेत. युवतीच्या संदर्भात अशा घटना घडत असतील तर पोलिसांनी अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. अशा प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. आयोग या प्रकरणात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. अशा घटनांमध्ये आरोपींना जामीन न देता कायद्याने त्यांच्यावर कडक कारवाई कशी करता येईल त्या दृष्टीने आयोग प्रयत्न करणार आहे. या दोन्ही प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी दोन्ही कुटुंबाची आणि मेयो रुग्णालयात दाखल असलेल्या त्या मुलीची भेट घेणार आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. जिल्ह्य़ातील पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून अशा प्रकरणात वेळीच कारवाई झाली पाहिजे असे निर्देश देण्यात आले आहे. योग्य दिशेने तपास होणे ही गरज आहे. पोलिसांनी अधिक संवेदनशील राहून जबाबदारीने कामे केली पाहिजे, असेही रहाटकर म्हणाल्या. या प्रकरणात कोणाला दोषी धरायचे याबाबतचा निर्णय मात्र तपास केल्यानंतर समोर येईल. चुकीच्या मानसिकतेतून सध्या गुन्हे घडत आहे. युवकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात शाळा व महाविद्यालयात जाऊन आयोगाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दारूबंदी संदर्भात अनेक जिल्ह्य़ात आंदोलन सुरू असताना या संदर्भात महिला आयोगाने पुढाकार घेतला आहे. काही सामाजिक संघटना आणि राज्याच्या विद्यापीठातील काही युवती आणि आयोगाचे सदस्य अशी समिती स्थापन करण्यात आली असून सर्व मिळून एक अहवाल तयार करणार आहे. त्यावर आयोग आपला स्वतंत्र अहवाल तयार करणार आणि तो राज्य शासनाला देणार असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. यावेळी आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे उपस्थित होत्या.

आयोगाचा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर पाच हजार प्रकरणे असताना आता ती १५०० वर आणली आहेत. प्रत्येक महिलेला सुनावणीसाठी मुंबईला येणे शक्य नसल्यामुळे वेगवेगळ्या भागात सुनावणी घेतली जाणार आहे. औरंगाबाद आणि कोल्हापूरमध्ये सुनावणी झाली असून मंगळवारी नागपुरात सहा जिल्ह्य़ाची सुनावणी घेतली जाणार आहे. जिल्ह्य़ातील समुपदेशकांची कार्यशाळा घेण्यात आली असून त्यांना महिलांच्या प्रश्नासंदर्भात माहिती देण्यात आली.

नागपूरचे पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात केलेले विधान चुकीच्या पद्धतीने केले असून त्या संदर्भात महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे. त्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याने महिलांच्या संदर्भात असे विधान करणे योग्य नाही. महिलांच्या बाबतीत कुठलेही विधान करताना नेत्याने किंवा अधिकाऱ्यांनी आपण काय बोलत आहोत, याचा विचार केला पाहिजे, असेही विजया रहाटकर म्हणाल्या.