डॉ. रणजीत पाटील यांच्या सहृदयतेने भारावले साखरकर कुटुंबीय

संकटात सापडलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील धावून आल्याचा प्रत्यय आला. पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी मुंबईकडे निघालेले अमरावतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम साखरकर भुसावळ रेल्वेस्थानकावर पडून गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: संपर्क साधत त्यांच्या उपचाराची सर्व व्यवस्था करून जबाबदारी घेतली. गंभीर जखमी असलेल्या साखरकर यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. रणजीत पाटील यांनी सहृदयतेने मदतीचा हात दिल्याचा अनुभव आल्याने साखरकर कुटुंबीय भारावून गेले आहेत.

कार्यकर्त्यांप्रती असलेली तळमळ डॉ. रणजीत पाटील यांच्या मदतकार्याच्या माध्यमातून नेहमीच दिसून येते. डॉ. पाटील यांच्या याच मदतीच्या वृत्तीचा अनुभव अमरावती जिल्ह्य़ातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांला संकटसमयी आला. भाजपचा वर्धापनदिन कार्यक्रम ६ एप्रिलला मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमरावती येथून ५ एप्रिलला विशेष रेल्वेगाडी सुटली होती. या गाडीतून अमरावती जिल्हय़ातील निंबारा लाहे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम नारायण साखरकर (६४) प्रवास करीत होते. गाडी भुसावळ रेल्वेस्थानकावर थांबली असताना पाणी घेण्यासाठी बळीराम साखरकर गाडीतून उतरले. गाडी अचानक सुटल्याने साखरकर गाडीत चढण्याच्या धावपळीत फलाटावर पडले. त्यामध्ये साखरकर गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारार्थ जळगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात आणले. या घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: साखरकर यांचे पुत्र रवि यांच्याशी संपर्क साधला. डॉ. पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या उपचाराची सर्व व्यवस्था केली. उपचार सुरू असताना बळीराम साखरकर यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे डॉ. पाटील यांनी साखरकर यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील चांडक रुग्णालयात हलवले. त्या ठिकाणी साखरकर यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू आहेत. अपघातात बळीराम साखरकर यांचा एक पाय पूर्णत: निकामी झाला असून, दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बळीराम साखरकर हे सेवानिवृत्त कोतवाल असून, घरची परिस्थिती बेताचीच आहे. संकटाच्या काळात डॉ. रणजीत पाटील धावून आल्याने साखरकर कुटुंबीयाला दिलासा मिळाला.

नेत्यातील डॉक्टर झाला जागृत

डॉ. रणजीत पाटील स्वत: ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यामुळे नेत्यातील डॉक्टर जागृत झाला असून, कार्यकर्त्यांच्या उपचारावर ते लक्ष ठेवून आहेत. डॉ. रणजीत पाटील यांनी नागपुरातील रुग्णालय गाठून बळीराम साखरकर यांची आस्थेने विचारपूस केली. डॉ. पाटील दैनंदिन संपर्कात असल्याने साखरकर कुटुंबीयाला मोठा आधार मिळाला.

साखरकरांच्या उपचाराला प्राधान्य

बळीराम साखरकर रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळाली. त्यामुळे तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधून उपचाराची सर्व व्यवस्था केली आहे. उपचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या योजनेतून सहकार्य घेण्यात आले असून, कार्यकर्त्यांनीही मदत केली आहे.

– डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री

डॉ. पाटील देवासारखे धावून आले

वर्धापनदिन कार्यक्रमासाठी मुंबईकडे जात असताना भुसावळ रेल्वेस्थानकावर माझ्या वडिलांचा मोठा अपघात झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचारासाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील देवासारखे धावून आले आहेत. त्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळेच व्यवस्थित उपचार सुरू आहेत.

– रवि साखरकर, अमरावती