महेश बोकडे

लोकप्रतिनिधींसह महावितरण, महसूलसह इतर खात्यातील बडे अधिकारीही थकित वीज देयकांच्या वसुलीसाठी असलेल्या माफीच्या योजनेचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे, देयक भरण्याची क्षमता असतानाही वर्षानुवर्षे देयक थकवून महावितरणला अडचणीत आणणाऱ्या या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचा महावितरणकडूनच सत्कार केला जात आहे. त्यामुळे महाकृषी ऊर्जा अभियानावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

करोनामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे वीज देयकाच्या वसुलीसाठी महावितरणचा धडाका सुरू आहे. महाकृषी ऊर्जा अभियानानुसार एकरकमी देयकाची रक्कम भरणाऱ्या थकबाकीदारांना सप्टेंबर २०२० पर्यंतच्या एकूण थकबाकीतून निर्लेखन बाजूला काढून व्याज व दंडाची रक्कम वजा करून देयक अदा केल्यास ५० टक्के रक्कम माफ करण्यात येते. या योजनेचा लाभ काँग्रेसचे स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र व काँग्रेसचे विद्यमान पदाधिकारी अशोक पाटील निलंगेकर यांनीही घेतला आहे. त्यांच्यावर कृषीदेयकाची ४ लाख ८८ हजार ५० रुपये थकबाकी होती. या योजनेनुसार ही रक्कम भरल्यावर महावितरणकडून त्यांचा सत्कार केला गेला. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त वामन गणपत कदम यांची उस्मानाबाद जिल्ह््यात लोहारा व उमरगा अशा दोन ठिकाणी शेती आहे. लोहारातील कृषिपंपाचे १ लाख २६ हजार २६४ रुपये तर उमरगातील १ लाख १३ हजार ७४३ रुपये थकले होते. योजनेनुसार त्यांनी लोहारातील देयकाचे ६० हजार रुपये भरून ६७ हजार रुपयांची  तर उमरगातील ५७ हजार रुपये भरून ७६ हजार रुपयांची माफी मिळवली.  महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ यांची उस्मानाबाद जिल्ह््यात कळंब तालुक्यात शेती आहे. कृषिपंप त्यांची पत्नी सुनीता यांच्या नावावर आहे. या पंपाचे ६८ हजार १८८ रुपये देयक थकले होते. त्यांनी ३७ हजार रुपये एकरकमी भरून ३० हजार रुपयांची माफी मिळवली. त्यामुळे महावितरणकडून त्यांच्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला.

ही योजना राज्यातील सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम भरून कुणीही त्याचा लाभ घेऊ शकतो. या प्रकरणांत तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी थकबाकी भरणाऱ्यांची नियमानुसार निवड करून सत्कार केला आहे.

– अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई</p>