फार्म हाऊसवरील बेकायदा धंदे, अंमली पदार्थाच्या पार्टीवरही करडी नजर; ‘लोकसत्ता’ सदिच्छा भेटीत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची माहिती

शहर पोलिसांच्या कारवाईनंतर अनेक हुक्का पार्लर संचालकांनी ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे. गोंडखरी, कळमेश्वर या भागात नवीन रेस्टॉरंटमध्ये हुक्का विक्रीची गोपनीय माहिती आहे. शिवाय ग्रामीण भागांमधील बडय़ा लोकांच्या फार्म हाऊसवर अवैध धंदे चालतात. तसेच तेथे अंमली पदार्थासह रात्र पार्टीचे आयोजन होत असल्याची माहिती असून त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

राकेश ओला यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, ग्रामीण भागात अपघात, चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. यात प्रामुख्याने शेतातील अवजारे, पाण्याची मोटर चोरीसारखे गुन्हे असतात. रस्ता अपघातासाठी अवैध प्रवाशी वाहतूकही जबाबदार असून त्यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस काम करीत आहेत. नागपूर-उमरेड मार्गावर प्रचंड वाहतूक आहे. शिवाय वेकोलि, पाचगाव येथील कोळसा व गौण खनिजाच्या उत्खननातील जड वाहनांची संख्या अधिक आहे. रस्त्यांवर नागमोडी वळण अधिक असल्याने अपघात होतात. बरेचदा त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी पोलिसांना  संयमाने जमावाला हाताळावे लागते. त्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांशी संवाद साधण्यापासून ते कायदा सुव्यवस्था हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे.  ग्रामीण भागात कोळसा, वाळू चोरीचे गुन्हे लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत वाळू चोरांवर तीन पटीने कारवाई केली असून त्यांच्याकडून कोटय़वधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीच्या नागरिकांकडून तक्रारी येतात. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध  कठोर कारवाई सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून तडीपार करण्याचे उपाय योजण्यात येत आहेत. काही पाडय़ांमध्ये गावचे गावच अवैध दारू विक्रीमध्ये असल्यास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले असून पोलीस बंदोबस्तात गावांवर  कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईला विरोध करणाऱ्या गावांमध्ये व्हिडीओ शूटिंगचे आदेश दिले आहेत. मध्यप्रदेश राज्याला ग्रामीणची सीमा लागून असल्याने शस्त्र तस्करी  विशेष नजर ठेवण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर शहरात हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे हुक्का पार्लर चालकांनी  आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. ग्रामीण भागातील नवीन रेस्टॉरंटमध्ये हुक्का व दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोंडखरी येथे एक मोठी कारवाई करून अनेकांना पकडण्यात आले. शिवाय फार्महाऊसवर अवैध धंदे चालत असल्याचे बोलले जाते. अशा फार्महाऊसची यादी तयार करून त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासासाठी अनेक निवासी संकुलाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. कार्यस्थळ चांगले असावे, यासाठी पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यात लोकांसाठी स्वागत कक्ष व अन्य बाबी असतील. आरोपींना पकडणे व त्यांना न्यायालयात शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. न्याय सहाय्यक पातळीवर पुरावे गोळा करणे व ते टिकण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. शिवाय न्यायालयात साक्षीदार उलटू नयेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत ओला यांनी व्यक्त केले.

महिला समुपदेशन केंद्र

उरमेडमधील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेण्यासाठी अधीक्षक कार्यालयात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात पोलीस, वकील, डॉक्टर आणि समुपदेशकांचा सल्ला महिलांना उपलब्ध असेल. आठवडाभरात केंद्र सुरू होणार आहे.