पाच आलिशान कारसह दोन महागाडय़ा दुचाकी जप्त

कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्याविरुद्ध फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आता त्याची संपत्ती जप्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी त्याच्या पाच आलिशान कार, दोन महागडय़ा दुचाकी आणि मोठय़ा प्रमाणात दागिने असा एकूण ५ कोटी ३० लाख ८९ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्या.

ही माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त गजानन राजमाने, तपास अधिकारी किशोर जाधव, पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, संतोष खांडेकर उपस्थित होते. गुजरातचे व्यापारी जिगर पटेल यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली.  यासंदर्भात पटेल यांनी उपराजधानीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अखेर याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.त्यात संतोष शशिकांत आंबेकरसह त्याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार (३४), चंदन ओमप्रकाश चौधरी (४४) रा. मुंबई, जुही चंदन चौधरी (३९) रा. मुंबई, अंकित महेंद्रभाई पटेल (३१) रा. अंकलेश्वर गुजरात, अजय लक्ष्मणभाई पटेल (३९) रा. मालाड, मुंबई, अरविंद द्वारकाभाई पटेल (४८) रा. सुरत, गुजरात आणि राजेंद्र ऊर्फ राजा गुलाबराव अरमरकर (५३) रा. खरे टाऊन, धरमपेठ हे आरोपी असून या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सर्व आरोपी १ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, शनिवारी गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेत संपत्ती जप्त केली. ही कारवाई रविवारी पहाटेपर्यंत सुरू होती.  यात पाच आलिशान कार, दोन दुचाकी व दागिने जप्त करण्यात आले. भविष्यातही अशी कारवाई करून त्याचे घर व इतर शहरातील अचल संपत्ती जप्त करण्यात येईल, अशी माहिती भरणे यांनी दिली.