मोहननगरातील खासगी रुग्णालयाचा प्रताप

नागपूर : जिल्ह्यातील काही  खासगी रुग्णालये नियम धाब्यावर बसवत अत्यवस्थ करोनाग्रस्तांवर उपचारासाठी दीड ते पाच लाख रुपयांपर्यंत अग्रीम  घेत असून त्याची पावती व देयकही दिले जात नाही. मंगळवारी एका रुग्णाच्या मुलाचे कामठी रोडवरील मोहननगरच्या एका रुग्णालयातील डॉक्टरसोबतचे याबाबतचे संभाषण समाजमाध्यमांवर प्रसारित केले. त्यानंतर त्याची तक्रारही महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली गेली. महापालिकेने संबंधित रुग्णालयाला तातडीने  उत्तर मागितले असून या रुग्णालयावर कारवाई होणार काय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ध्वनीफितीतील संभाषणानुसार,  एका तरुणाच्या वडिलांची प्रकृती करोनामुळे अत्यवस्थ झाली. तातडीने जीवनरक्षण असलेली खाट हवी असल्याने त्याने या खासगी रुग्णालयाशी संपर्क साधला. त्याला पाच लाख रुपये अग्रीम मागण्यात आले. त्यातील साडेचार लाख  रुग्णालयात भरले. त्यावेळी  पावती दिली गेली नाही.

उपचारादरम्यान औषधांसह इतर तपासणीचे सुमारे १.२० लाखाचे शुल्कही मुलाने वेगळे भरले. कालांतराने दहा दिवसांनी रुग्ण बरा झाला. त्यानंतर मुलाने रुग्णालयाला अग्रीम व रुग्णावर केलेल्या उपचाराबाबतचे देयक व पावती मागितली. परंतु रुग्णालयाने ते देण्यास सपशेल नकार दिला. उलट तुम्हाला एवढ्या रकमेचे देयक देणार नसून सीजीएचएसच्या नियमानुसार तुम्हाला प्रतिपूर्ती मिळेल तेवढेच देयक देण्याचे सांगण्यात आले. मुलाने वडिलांवर उपचारासाठी उसनवारीवर पैसे आणले होते. त्यामुळे देयक जितक्याचे असेल, तेवढी रक्कम घेऊन इतर रक्कम परत मागितली असता रुग्णालयाने अजब उत्तर दिले. आम्हाला सरकारने २० टक्के खाटावर मनात येईल तितके शुल्क घेण्याची मुभा दिल्याचे सांगण्यात आले.

शेवटी रुग्णाच्या मुलाने  डॉक्टरांसोबतचे हे संभाषण समाजमाध्यमावर प्रसारित केले. सोबतच नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे तक्रार करण्यात आली. महापालिकेने तातडीने डॉक्टरांना नोटीस देत उत्तर मागितले आहे. या ध्वनीफितमध्ये उल्लेख असलेल्या विम्स रुग्णालयाच्या डॉ. राजेश सिंघानीया यांच्याशी लोकसत्ताने भ्रमणध्वनीवर दोनवेळा संपर्क साधला असता डॉक्टर शल्यक्रियेत  व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.  डॉक्टरांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवूनही प्रतिसाद  मिळाला नाही.

रुग्णाच्या मुलाने दुपारी माझी भेट घेऊन संबंधित रुग्णालयाने  साडेचार लाख रुपये अग्रीम घेऊनही देयक व पावती दिली नसल्याची तक्रार दिली. त्यावर महापालिकेने तातडीने रुग्णालयाला उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. रुग्णालयाचा दोष असल्यास निश्चित त्यांच्यावर कारवाई करून रुग्णाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी नियमानुसार मदत केली जाईल. – जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त,  महापालिका.