’ शासकीय रुग्णालयातील अनास्थेचा फटका!
’ ‘एमआरआय’करिता पैसे नसल्याने रुग्णालयातून सुटी
अत्याचारग्रस्त पीडितांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांची मदत घ्यावी लागत असताना तेथील शासकीय अनास्थेचा कसा फटका बसतो याचे संतापजनक उदाहरण नुकतेच उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुलीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनीही रुग्णालयातच भेट घेतली होती.
नागपूर जिल्ह्य़ातील रामटेक तालुक्यातील कांद्री येथे एका १४ वर्षीय मुलीने अतिप्रसंगाला विरोध केल्याने तिच्या हाताची दोन बोटे आरोपीने सत्तूरने कापली होती. ही घटना गेल्या १८ मे रोजी घडली होती. ही मुलगी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना कुटुंबीयांकडे ‘एमआरआय’करिता पैसे नसल्याने पीडित मुलीला त्याच दिवशी डॉक्टरांनी रुग्णालयातून सुटी दिली. उपचारादरम्यान अनेक औषधांकरिता तिच्या कुटुंबीयांना खासगी दवाखान्यांचा रस्ता दाखवला गेला.
नागपूर शहर आणि जिल्ह्य़ात पोलिसांचा चांगला वचक असून गुंडांच्या मुसक्या आवळल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांनी कामठी येथे काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केला होता. परंतु रामटेक तालुक्यातील कांद्री येथे एका मुलीबरोबर झालेला हा प्रकार दुर्दैवी आहे. पीडित मुलगी १८ मे २०१६ रोजी पहाटे शौचास गेल्यावर तेथे ४५ वर्षीय महेश रौतेल या गुंडाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या मुलीने विरोध केल्यावर संतापलेल्या महेशने सत्तूरने तिच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर वार केले. त्यात मुलीच्या उजव्या हाताची दोन बोटे कापली गेली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीला तातडीने प्रथम जवळच्या शासकीय रुग्णालयात व त्यानंतर मेयो रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. हा संतापजनक प्रकार ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी २३ मे रोजी मेयोत जावून पीडित अल्पवयीन मुलीची आस्थेने विचारपूर केली. परंतु त्यानंतर शासकीय यंत्रणेला तिचा विसरच पडला. खरं तर शासनाच्या दाव्या प्रमाणे तिच्यावरील सर्व उपचार व तपासण्या मोफत होणे अपेक्षित होते. परंतु बरीच औषधेच उपलब्ध नसल्याचे सांगत पीडित मुलीच्या गरीब कुटुंबीयांच्या हाती आवश्यक असलेल्या औषधांची यादी डॉक्टरांनी दिली. कसेबसे पैसे जमवून तिच्या नातेवाईकांनी औषधे आणली. मात्र उपचारा दरम्यान मुलीच्या हाताच्या संवेदना कमी होत गेल्या. तेव्हा तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून तिच्या कुटुंबीयांना प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आले. याप्रसंगी मेयोकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे अपेक्षित होते परंतु त्याचीही व्यवस्था झाली नाही अखेर तिच्यासह कुटुंबीयांना ऑटोरिक्षाने पाठवले गेले. त्याचाही खर्च कुटुंबीयांनाच उचलावा लागला. प्लास्टिक सर्जरीच्या डॉक्टरांच्या सल्यानंतर मुलीच्या हातावरील सूज बघून तिला ‘एमआरआय’ करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र या कुटुंबीयांकडे त्यासाठी पैसे नसल्याने ते मेडिकलमध्ये जावून परत आले. त्यांच्याकडे पैसे नसल्याचे कारण सांगून तेथील डॉक्टरांनी पीडित मुलीला जबरदस्ती रुग्णालयातून सुटी दिली.
पीडित मुलीचे वडील अशिक्षित असल्याने त्यांचा एका कागदावर अंगठाही घेण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज कार्डही दिले गेले नाही. तिला घरी परत नेल्यावर तिच्या बोटातून काही दिवसांत पुन्हा रक्तस्राव सुरू झाला. पुन्हा उपचाराकरिता जवळच्या आरोग्यसेवा रुग्णालयात नेल्यावर डिस्चार्ज कार्ड नसल्याचे सांगत तिच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांना घेऊन समाजसेविका नूतन रेवतकर या अधिष्ठाता कार्यालयात गेल्या. अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांनी त्वरित संबंधित विभागाला डिस्चार्ज कार्ड तयार करून संबंधिताला मदत करण्याच्या सूचना केल्या.

पीडित मुलीला रुग्णालयातून सक्तीने सुटी दिली नसून नातेवाईकांच्या सल्ल्यानेच देण्यात आली. रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे रुग्णांना मोफत पुरवली गेली. इतर काही औषधे नातेवाईकांनी बाहेरून आणली. मेडिकलमध्ये प्लास्टिक सर्जनचा सल्ला घेण्यासह ‘एमआरआय’च्या तपासणीकरिता रुग्णाला तेथे पाठवण्यात आले होते. रुग्णाला येथे चांगले उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
– डॉ. मधुकर परचंड, अधिष्ठाता,
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), नागपूर</strong>