शासनाच्या निर्णयानंतरही अद्याप कायम सेवेचे आदेश नाही

मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील रोजंदारीवरील कामगारांना अटी शिथील करून कायम करण्यात आले. परंतु, विदर्भातील मेडिकल, मेयोसह काही वैद्यकीय महाविद्यालयात रोजंदारी कामगारांना कायम करताना बऱ्याच अटी घातल्या गेल्या. त्यांची पूर्तता केल्यानंतर राज्यातील ७४४ रोजंदारी कामगारांना कायम करण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळात झाला. परंतु, विदर्भातील अकोला, यवतमाळ, नागपुरातील मेडिकल आणि मेयोतील रोजंदारी कामगारांना अद्यापही स्थायी न केल्याने ते अस्थायीच आहे. त्याने या कामगारांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे बोलले जाते.
राज्यातील ७४४ रोजंदारी कामगारांना कायम करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली. ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जेजेत ७१ जण कायम झाले. न्यायालयीन प्रक्रियेतून हे कायम झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, मेडिकलमधील न्यायालयीन प्रकरणातील कामगार अद्याप रोजंदारीवर काम करीत आहेत. मेयोत हीच स्थिती आहे. नागपूरच्या मेयो- मेडिकलसह राज्यभरातील रोजंदारी कामगारांना कायम करण्यासंदर्भात यादी तयार झाली. मात्र, अद्याप मेयो- मेडिकलमधील रोजंदारी कामगारांना कायम सेवेत समावून घेतले नसल्याचे उघड झाले आहे. मेडिकल- मेयोत तीस पस्तीस वर्षे तोकडय़ा पगारात सेवा दिल्यानंतरही त्यांच्या कामाचे मोल शासनाने कवडीमोल ठरवले.
मेडिकल- मेयोमधील सर्वच रोजंदारी कामगारांना कायम सेवेत समावून घेण्यात यावे, या मागणीसाठी सगळ्याच कामगार संघटनांनी आंदोलन केले. दोनशेवर रोजंदारी कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाच्या वैद्यकीय संचालनालयातून गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. शासनाने रोजंदारी कामगारांना कायम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी मेडिकलच्या सगळ्याच चतुर्थश्रेणी कामगारांच्या संघटनेकडून होत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास मेडिकल, मेयोत सगळ्या संघटनांचे एकत्रित आंदोलन होण्याचीही शक्यता नकारता येत नाही. त्याने रुग्णसेवा कोलमडण्याचाही धोका व्यक्त होत आहे. मेडिकल प्रशासनाने या कामगारांना कायम सेवेत घेण्याची प्रक्रिया मुंबईस्तरावर सुरू असून, योग्य निर्णय होण्याची आशा व्यक्त केली.