रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या एका परिचारिकेवर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रक्ताअभावी जीव गमावण्याची वेळ आली. गडचिरोली जिल्ह्यतील अहेरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात एनसीडी विभागात कार्यरत परिचारिका प्रीती आत्राम यांच्या मृत्यूने तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.
प्रीती आत्राम सिकलसेल या आजाराने ग्रस्त होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिकलसेलच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. प्रीती आत्राम यांनाही रक्ताची गरज भासली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध होते, पण त्यांना वेळेवर रक्त देण्यात आले नाही.
एरवी अनेक संघटना रक्तदाते जमवून रक्त देत असतात. अशा हजारो रक्तदान शिबिरात प्रीती आत्राम यांनी सहभागी होऊन रक्त गोळा केले. अहेरी उपजिल्हा रुग्णालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिरातच नव्हे तर इतर संघटनांतर्फे आयोजित शिबिरातसुद्धा रक्त गोळा करण्यासाठी त्या सहभागी होत होत्या. रक्ताअभावी रुग्णाचा जीव जाऊ नये म्हणूान जीवाचे रान करीत रुग्णांपर्यंत रक्त पोहोचवत होत्या. या दरम्यान रक्ताअभावी आपल्यालाही कधी मृत्यू येईल असा विचार त्यांनी केला नसावा. त्यांच्या स्वत:वर वेळ आली तेव्हा मात्र रक्त उपलब्ध असतानाही त्यांच्यापर्यंत ते वेळेवर पोहोचवण्यात आले नाही. अखेरच्या क्षणापर्यंत त्या तडफडत राहिल्या. या परिचारिकेला वेळेपर्यंत रक्त न मिळाल्यामुळे अखेर मृत्यूला कवटाळावे लागले. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे या परिचारिकेला मृत्यू यावा यापेक्षा मोठी शोकांतिका नाही.
रुग्णांबाबत आम्ही कधीच हेळसांड करीत नाही आणि प्रीती आत्राम तर आमच्याच विभागाच्या कर्मचारी होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही असा दुजाभाव कसा करणार? त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यापूर्वी त्यांना स्थिर करणे आवश्यक होते. त्यांचे हिमोग्लोबीन अवघ्या पाचवर गेले होते. आम्ही त्यांच्यावर उपचार सुरू केले. रक्ताची गरज भासली तेव्हा रक्तदेखील लावले. मात्र, आधीच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि त्या मृत पावल्या. त्यांना रक्त दिले नाही किंवा उपचारात हेळसांड केली, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद खंडाते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 3:08 am