महेश बोकडे

उत्पादन व पुरवठा समान पातळीवर; अग्रीम रक्कम दिल्यावरही दोन दिवसांची प्रतीक्षा

कोविड रुग्णालयांत प्राणवायू पुरवठा विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. प्राणवायू उत्पादकांनी उद्योगांना पुरवठा कमी करून रुग्णालयांना वाढवला खरा, परंतु त्यानंतरही रोजचे प्राणवायू उत्पादन व पुरवठा समसमान पातळीवर आला आहे. परिणामी अग्रीम रक्कम दिल्यावरही रुग्णालयांना दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.

नागपूर विभागात प्राणवायू उत्पादन करणाऱ्या सहा ते सात  कंपन्या आहेत. सगळ्यांचे तीन जिल्ह्य़ांत एकूण १२ उत्पादन प्रकल्प आहेत. सर्वाधिक पाच कंपन्या आयनॉक्स एअर प्रॉडेक्टच्या आहेत. सर्वाधिक ९ प्राणवायू उत्पादन प्रकल्प नागपूर जिल्ह्य़ात असून वर्धा येथे १, चंद्रपूरला २ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांकडून औद्योगिक आणि रुग्णालय  अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणवायूचे उत्पादन घेतले जाते. सर्व कंपन्यांमध्ये पूर्वी ८० टक्के उत्पादन उद्योगांसाठी तर २० टक्के उत्पादन रुग्णालयांसाठी घेतले जात होते. परंतु आता करोनाबाधित  वाढल्याने  अचानक प्राणवायूची मागणी वाढली. त्यामुळे आता ८० टक्के उत्पादन रुग्णालयांसाठी तर २० टक्के उद्योगासाठी घेतले जात आहेत.

गरज पूर्ण होत नसल्याने  भिलाईतील प्रकल्पातून नागपूरला प्राणवायू पुरवला जात आहे. या काळात  रुग्ण वाढल्यास वाढीव प्राणवायूबाबतही नियोजन नाही. आता कुठे जिल्हा प्रशासन भिलाईच्या प्रकल्पातून प्राणवायू मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठय़ाची स्थिती जास्तच गंभीर आहे. येथे अग्रीम रक्कम दिल्यावरही दोन-दोन दिवस पुरवठा होत नसल्याच्या रुग्णालयांच्या तक्रारी आहेत. नागपुरात सध्या मेडिकल, मेयो, एम्स या शासकीय रुग्णालयांसह सुमारे ३४ खासगी रुग्णालयांना ३ ऑगस्टपर्यंत करोना बाधितांवर उपचाराची मंजुरी होती. त्यानंतर आणखी मोठय़ा संख्येने खासगी रुग्णालये वाढवली गेली. परंतु प्राणवायू पुरवठय़ाचे फारसे नियोजन झाले नाही.

मागणीत वाढ

प्रशासनाच्या माहितीनुसार, जून २०२० मध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांमध्ये ४४९.७४ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला. जुलै महिन्यात हा पुरवठा ५७७.९४ मेट्रिक टन होता. तो जुलैच्या तुलनेत  २८.५० टक्यांनी अधिक आहे. ऑगस्ट महिन्यात  ७६८.७६ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला. तो जुलैच्या तुलनेत ३३ टक्के तर जून महिन्याच्या तुलनेत तब्बल ७० टक्के अधिक आहे. त्यातच  विविध जिल्ह्य़ांमधील रुग्णालयांत लागणाऱ्या एकूण प्राणवायू पैकी तब्बल ७१ टक्के प्राणवायू केवळ नागपूर जिल्ह्य़ात लागत आहे.

अडचण काय?

नागपूर विभागात प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या टँकरची संख्या खूपच कमी आहे. दुसरीकडे अचानक अकोला, वर्धा, अमरावती, छिंदवाडा परिसरातही प्राणवायूची मागणी वाढल्याने तेथेही नागपूरहून पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे येथील पुरवठय़ावरही परिणाम होत आहे.

प्राणवायू पुरवठय़ाची स्थिती नियंत्रणात आहे. औद्योगिक प्राणवायूचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना उत्पादनाचे परवाने देत तातडीने  वैद्यकीय प्राणवायूच्या उत्पादनाच्या सूचना केल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी उत्पादनही सुरू झाले आहे. शेजारच्या राज्यातूनही आयातीचे प्रयत्न सुरू आहे.

– महेश गडेकर, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (औषध), नागपूर विभाग.

इंडियन मेडिकल असोसिएशनसह  इतर संस्थांनी प्रशासनाला याबाबत  सूचना दिल्या. परंतु त्यावेळी रुग्ण कमी असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता रुग्ण वाढल्याने सर्व त्रुटी पुढे येत असून  प्राणवायू पुरवठय़ाबाबतही अडचणी आहेत.

– डॉ. अशोक आढव, पेट्रन, आयएमए (राज्य शाखा).