सुरुवातीला मोठा फटका

नागपूरसारख्या राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असणाऱ्या शहरातील हॉटेल (रेस्टॉरन्ट नव्हे) व्यवसायाला चलन टंचाईचा पहिल्या टप्प्यात मोठा फटका बसला. ऐनवेळी बुकिंग रद्द झाले, शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली, त्यामुळे निम्मा व्यवसायच बुडाला. मात्र, दुसऱ्या आठवडय़ापासून या व्यवसायाची गाडी रुळावर येऊ लागली. तरी अजूनही नेहमीच्या तुलनेत १५ ते २० टक्के फटका कायम आहे.

[jwplayer zkvFlBpu]

नागपूर शहरात १५० मोठी हॉटेल्स आहेत. त्यात २० ते ३० ही तारांकित आहेत. देशाचे मध्यवर्ती ठिकाण, मिहान आणि सेझमध्ये येऊ घातलेले मोठे औद्योगिक प्रकल्प, सध्या सुरू असलेले उद्योग, शहरात होणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा आणि पेंच, ताडोबा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी देश-विदेशातून येणारे पर्यटक यामुळे शहरातील हॉटेल व्यवसाय हा बाराही महिने तेजीत असतो. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ या व्यवसायासाठी हंगामाचा काळ असतो. डिसेंबर महिन्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन असल्याने या काळात शहरातील सर्व प्रमुख मोठे हॉटेल्स नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून अधिवेशन संपेपर्यंतच्या काळात फुल्ल असतात. सनदी अधिकारी, मंत्री, त्यांचे कार्यकर्ते यांचा मुक्काम हा हॉटेलमध्येच असतो. यंदाही हॉटेल व्यवसाय तेजीत असतानाच ८ नोव्हेंबरला रात्री पंतप्रधानांनी अचानक पाचशे, हजाराच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्याचा फटका या व्यवसायाला बसला. चलन टंचाईमुळे बुकिंग रद्द झाले. हॉटेलमध्ये थांबणाऱ्यांनी त्यांचा मुक्काम याच कारणामुळे हलविला. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही कमालीची घट झाली. त्यामुळे पहिल्या आठवडय़ात निम्म्या खोल्या खाली होत्या. हॉटेलमधील बरेचसे व्यवहार हे डेबिट किंवा क्रेडिट कार्डमुळे होत असले तरी बाहेर नोटांची गरज भासते. त्यामुळे हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्यांनी त्यांच्याकडे पुरेसे पैसे आल्यावरच बाहेर पडणे सुरू केले. त्यामुळे दुसऱ्या आठवडय़ापासून व्यवसाय पुन्हा रुळावर येणे सुरू झाले, असे नागपूर हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष तेजविंदरसिंग रेणू यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

अजूनही १५ टक्के फटका

बाहेरून शहरात येणाऱ्यांची संख्या कमी झाली. नोटा बदलण्यासाठी लोकांकडे वेळही नव्हता, त्यामुळे अनेकांनी बुकिंग रद्द केली. काहींनी त्यांच्या प्रवासाचा बेत पुढे ढकलला. याचा फटका व्यवसायाला बसला. आता टप्प्याटप्प्याने तो रुळावर येत आहे. मात्र, तरीही १५ टक्के फटका आहेच. पुढील महिन्यात हिवाळी अधिवेशन आहे आणि लोकांकडे पैसाही आला आहे. त्यामुळे ही तूट भरून निघेल.

– तेजविंदरसिंग रेणू

उपाध्यक्ष, नागपूर हॉटेल्स ओनर्स असोसिएशन

[jwplayer 1yLms27W]