शासनादेश धुडकावत जुन्या दराने दिले मानधन

देवेश गोंडाणे, नागपूर</strong>

राज्य सरकारने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१८ मध्ये घेतला. त्यानुसार महाविद्यालयांमधील कंत्राटी प्राध्यापकांना वाढीव मानधन देण्यात आले. मात्र, या प्राध्यापकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शासनादेश धुडकावत  जुन्याच दराने मानधन देऊ केले आहे. यामुळे आधीच बेरोजगारीने हताश असलेल्या प्राध्यापकांमध्ये विद्यापीठाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरतीच होत नसल्याने अनेक नेट, सेट उत्तीर्ण प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करतात. मात्र, विद्यापीठाने जणू त्यांची पिळवणूक करण्याचे धोरण आखले आहे. मागील शैक्षणिक सत्रातील कंत्राटी प्राध्यापकांचे मानधन डिसेंबर २०१९ मध्ये जमा करण्यात आले. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधन वाढीचा आदेश १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढला होता. त्यात नवी नियमावली दिली आहे. त्यानुसार या प्राध्यापकांना आता प्रतितासिका ५०० रुपये एवढे मानधन मिळणार होते. त्यामुळे वाढीत दराने मानधन जमा होईल, अशी अपेक्षा प्राध्यापकांना होती. मात्र, जुन्या तासिका दराने मानधन मिळाल्याने प्राध्यापकांच्या अपेक्षेवर विरजण पडले. शासनादेशात १४ नोव्हेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०१९ या शैक्षणिक कालावधीमध्ये प्राध्यापकांना नवीन वाढीव दराने मानधन द्यावे, असे सूचित करण्यात आले होते.

नागपूर विभागाच्या तत्कालीन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर यांनी विद्यापीठाला १३ मार्च २०१९ रोजी तसे पत्रही दिले होते. परंतु, विद्यापीठाने या प्राध्यापकांना पाच महिन्यांचे मानधन जुन्याच दराने दिले आहे. प्राध्यापक वर्गाकडून याचा विरोध होत असून विद्यापीठ प्रशासनाच्या धोरणाचा निषेध केला जात आहे.

म्हणून दिले जुन्या पद्धतीने मानधन

शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नेमणूक करताना त्यांचे दर ठरवून दिले होते. शासनाकडून मानधन वाढ करण्याचा आदेश नोव्हेंबरमध्ये आला. त्यामुळे विद्यापीठाला अध्रे सत्र संपल्यावर मध्येच मानधन वाढ करणे शक्य झाले नाही. त्यातही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन हे शासनाकडून देण्यात येते. मात्र, विद्यापीठातील प्राध्यापकांना सामान्य निधीतून मानधन दिले जाते. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता हवी असते. त्यामुळे विद्यापीठाने मानधन हे जुन्याच पद्धतीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.